‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी निर्माण झालेले वादळ अद्याप शमले नाही. या वादळाला तालासुरांची साथ देत काँग्रेस खासदारांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘तानाशाही-हिटलरशाही नही चलेगी, बदले की राजनीती नही चलेगी..’ या घोषणांना विरोधकांनी तालबद्ध टाळ्यांची साथ दिली. अगदी गमतीशीर वातावरणात विरोधक टाळ्यांच्या तालावर घोषणाबाजी करीत होते.
काँग्रेस खासदारांच्या या रंगतदार तालबद्ध घोषणाबाजीवर भाजप खासदार किरण खेर व पूनम महाजन यांनादेखील ठेका धरावासा वाटत होता; परंतु लगेचच त्यांनी त्यातून माघार घेतली. हा प्रकार सत्ताधाऱ्यांनादेखील अजब वाटला. काँग्रेस खासदारांचा ‘टाळ्या’बद्ध घोषणाबाजीचा उत्साह अवघी काही मिनिटे टिकला. त्यानंतर घशाला कोरड पडेपर्यंत त्यांची घोषणाबाजी सुरू होती. या सर्व प्रकाराचे साक्षीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. प्रश्नोत्तराचा तास संपल्यावर मात्र मोदी लगेचच सभागृहातून बाहेर पडले.
लोकसभा व राज्यसभेत अगदी पहिल्या मिनिटापासून काँग्रेस खासदार लोकसभा अध्यक्ष व सभापतींच्या आसनासमोर गोळा झाले. एरवी आपले आसन न सोडणारे माजी केंद्रीय मंत्री के. वी. थॉमसदेखील लोकसभेत स्वपक्षाच्या खासदारांना सामील झाले होते. राज्यसभेतदेखील माजी केंद्रीय मंत्री कुमार शेलजा, अश्वनीकुमार आदी माजी केंद्रीय मंत्री उपसभापती पी. जे. कुरियन यांच्या आसनासमोर घोषणा देत होते. प्रश्नोत्तराच्या तासानंतर लोकसभेतील सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे बोलण्यास उभे राहिले.
ते म्हणाले की, देशात दोन कायदे अस्तित्वात आहेत. सत्ताधाऱ्यांसाठी असलेल्या कायद्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांविरोधात आरोप झाले तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही; परंतु जे निष्ठावान व प्रामाणिक (सोनिया व राहुल गांधी) यांच्यावर अन्याय केला जात आहे. हे दडपशाहीचे राजकारण आहे. सर्व विरोधकांना घाबरवण्यात येत आहे. दलितविरोधी वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री वी. के. सिंह यांच्यावरही खरगे बरसले. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली.राज्यसभेत लोकसभेसारखेच चित्र होते. तेथे सर्वाधिक ‘गुजरात पॅटर्न नही चलेगा’ ही घोषणा दिली गेली. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी, सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला.