09 March 2021

News Flash

रवींद्र गायकवाड यांनी केली दिलगिरी व्यक्त, विमान प्रवासावरील बंदी उठवण्याची विनंती

अशोक गजपती राजू यांना रवींद्र गायकवाड यांनी लिहिले पत्र

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड. (संग्रहित)

रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासाची बंदी उठवा अथवा एनडीएच्या जेवणाच्या निमंत्रणावर बहिष्कार घालू असे शिवसेनेनी म्हटले होते. परंतु, खासदार रवींद्र गायकवाड यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून आपल्यावर असणारी विमान प्रवासाची बंदी उठवण्यात यावी अशी विनंती नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांना केली आहे.
२३ मार्च रोजी झालेल्या प्रकाराबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो असे त्यांनी म्हटले. झालेला प्रकार व्हावा अशी कुणाचीही इच्छा नव्हती.

सध्या या प्रकरणाबाबत चौकशी सुरू आहे. आपण कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यास तयार आहोत तेव्हा आपल्यावरील विमान प्रवासाची बंदी उठवण्यात यावी असे त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या बंदीमुळे माझ्या कामावर परिणाम होत आहे. माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मला विमान प्रवास आवश्यक आहे तेव्हा ही बंदी उठवण्यात यावी असे ते म्हणाले. चौकशीअंती सत्य समोर येईलच परंतु त्याआधी माझ्यावरील विमान प्रवासाची बंदी उठवावी असे ते म्हणाले.

आज सकाळीच लोकसभेत रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान प्रवास बंदी घातल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदारांनी गदारोळ केला. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी बंदी घातल्याच्या प्रकरणात मोघम उत्तर देणाऱ्या नागरी हवाई उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांच्याविरोधात शिवसेनेने संताप व्यक्त केला होता. शिवसेना खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाजही काही वेळासाठी तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर खासदारांनी राजू यांना घेरावही घातला होता. यानंतर मध्यस्थी करत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व घडामोडींनंतर राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि अशोक गजपती राजू यांच्यासोबत शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्यात रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदी प्रकरणी तोडगा काढण्याचे आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

बलात्कारी, दहशतवादी, इतकेच काय तर काश्मिरी फुटीरतावादीही विमानाने प्रवास करू शकतात; मग गायकवाड का नाही, असा सवालही खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्याचेही राऊत यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणामागे कोण आहे, हे लवकरच आम्ही जगासमोर आणू, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 9:45 pm

Web Title: mp raveendra gayakwad regrets over incident ashok gajpati raju indian airlines
Next Stories
1 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला उर्जित पटेल यांची विरोधी भूमिका
2 बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीरला पूराचा वेढा; लष्कराचे जवान बनले ‘देवदूत’
3 ‘त्या’ची किंवा ‘ती’ची ‘सोशल’ बदनामी टाळण्यासाठी फेसबुकचे नवे फिचर
Just Now!
X