भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती बिघडली आहे. भोपाळ येथील भाजपा कार्यालयात एका कार्यक्रमादरम्यान आयोजित एका कार्यक्रमात भोवळ आल्याने प्रज्ञा सिंह ठाकूर बेशुद्ध झाल्या. या कार्यक्रमात अनेक नेते उपस्थित होते. प्रज्ञा सिंह बेशुद्ध होताच कार्यक्रमस्थळी एकच धावपळ सुरु झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांना चक्कर आली आणि खाली कोसळल्या. गेल्या काही काळापासून प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती खराब असून त्या उपचार घेत आहेत. काँग्रेसच्या कार्यकाळात आपल्यावर झालेल्या अत्याचारामुळे प्रकृतीच्या तक्रारी असल्याचा आरोपही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी रविवारी केला होता. रविवारी २१ जून रोजी ‘योगा डे’ निमित्त आयोजित भाजपा कार्यालयातील कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होता.

काही दिवसांपूर्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर त्या भोपाळमध्ये परतल्या होत्या. आज कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर, त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि प्रकृती बिघडली. प्रज्ञा सिंह ठाकूर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. २०१९ लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांचा भोपाळमधून पराभव केला.