महाराष्ट्रापासून ते छत्तीसगडपर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ३३ जणांची हत्या करणारा मध्य प्रदेशचा सीरियल किलर आदेश खांब्राने पोलिसांना हत्या करण्यामागचं कारण सांगत नवा खुलासा केला आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की, ‘आपल्याला कधीही वडिलांकडून प्रेम मिळालं नाही, म्हणूनच आपण असे झालो’. व्यवसायाने टेलर असणाऱ्या आदेश खांब्रावर ३३ ट्रकचालकांच्या हत्येचा आरोप आहे. त्याने पोलिसांकडे यासंबंधी कबुलीही दिली आहे.

आदेश खांब्राने पोलिसांना सांगितल्यानुसार, ‘कोणीही माझी काळजी घेत नसे. मी खूपच एकटा पडलो होतो. माझ्यामध्ये इतका राग भरला होता की मी कधी हिंसक झालो माझं मलाच कळलं नाही’. पोलीस मात्र त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आहेत. चौकशीदरम्यान त्याने अनेकदा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

श्रीमंत होण्यासाठी ३३ ट्रकचालकांची हत्या, टेलर ते सीरिअल किलरपर्यंतचा प्रवास ऐकून पोलीस चक्रावले

आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘त्याचे वडील गुलाब खांब्रा लष्करात होते. मैदानावरील शिस्त ते घरातही आणत असत. ते अत्यंत कडक शिस्तीचे होते. ते अनेकदा मारहाण करत असत. कधीकधी घरातून बाहेरही काढत असत’. पोलीस मात्र त्याने दिलेली प्रत्येक माहिती तपासून पाहत आहेत.

काय आहे प्रकरण –
मध्य प्रदेश पोलिसांनी जेव्हा आदेश खांब्रा याला अटक केली तेव्हा त्यांना तो एक साधा गुंड असेल असं वाटलं होतं. व्यवसायाने टेलर असणाऱ्या आदेश खांब्राने जेव्हा पोलिसांसमोर आपले गुन्हे उघड करण्यास सुरुवात केली तेव्हा पोलीसही चक्रावले. आदेश खांब्राने आपण एकूण ३३ जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. श्रीमंत होण्यासाठी आदेश खांब्रा सीरियल किलर झाला आणि गेल्या आठ वर्षात त्याने तब्बल ३३ जणांची हत्या केली आहे. यामध्ये सर्वजण ट्रकचालक आणि क्लिनर्स होते.

आदेश खांब्रासहित एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. जयकिरण प्रजापती आणि आदेश खांब्रा हे दोघे या टोळीचे म्होरके होते. यांच्या अटकेमुळे ट्रकचालक आणि क्लिनरची हत्या करुन लूटमार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीने मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, नाशिकसहित अनेक शहरांमध्ये हत्या केल्या आहेत. ट्रकचालक, क्लिनर्सना गुंगीचं औषध देऊन त्यांची हत्या करुन लुटणे ही या टोळीची मोडस ऑपरेंडी होती.

‘खांब्रा याला प्रत्येक हत्येसाठी ५० हजार रुपये मिळायचे. जेव्हा तो टोळीत सामील झाला तेव्हा त्याचा उद्देश फक्त पैसे कमावणे होता. पण काही वर्षांपूर्वी त्याच्या मुलाचा अपघात झाला आणि त्याला उपचारासाठी कर्ज घ्यावं लागलं. कर्ज फेडण्यासाठी तो अजून गुन्हे करु लागला’, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

खांब्रा अत्यंत चलाखीने हत्या करत असल्याने नागपूर पोलीस २०१४ मध्ये अटक करुनही गुन्हा सिद्ध करु शकले नाहीत, ज्यामुळे त्याची जामीनावर सुटका झाली. हत्या करण्याआधी खांब्रा फक्त सीम कार्ड नाही तर मोबाइलही बदलत असे. गेल्या चार वर्षात त्याने एकूण ५० सीम कार्ड आणि ४५ मोबाइल वापरले आहेत असं पोलिसांनी सांगितलं आहे.

कुठे, किती हत्या –
मध्य प्रदेश – २१
छत्तीसगड – ५
महाराष्ट्र – ५
ओडिशा- 2