किडनी निकामी झाल्याने उपचार घेत असलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना किडनी देण्यास मध्यप्रदेशातील एका पोलिस हवालदाराने तयारी दर्शवली आहे. गौरव सिंह डांगी (वय २६) असे या हवालदाराचे नाव असून तो वाहतूक पोलिसांत कार्यरत आहे. डांगी याने ट्विटरवर सुषमा स्वराज यांना किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी माझी किडनी दान करू इच्छितो. माझा रक्त गट ओ पॉझिटव्ह आहे, अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.
सुषमा स्वराज यांची किडनी निकामी झाल्याचे समजले तेव्हा मला त्यांची काळजी वाटू लागली. जर वैद्यकीय तपासणीत माझी किडनी त्यांच्यावर प्रत्यार्पण करण्यास योग्य असेल तर मी माझी एक किडनी त्यांना देण्यास तयार आहे, असे त्याने म्हटले. सुषमा स्वराज यांच्या कामामुळे आपण प्रभावित झालो आहोत. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांचे काम चांगले असल्यामुळेच मी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना किडनी देण्यास तयार असल्याचे सांगितले. सुषमा स्वराज या माझ्या नातेवाईक नाहीत, असेही तो म्हणाला.
एका किडनीनेही मला सामान्य जीवन जगता येईल. किडनी दिल्यानंतरही मी वाहतूक पोलिसांत काम करून देशसेवा करू शकतो, असे त्याने म्हटले. डांगी हा मूळचा टिकमगड जिल्ह्यातील निवाडी तालुक्यातील टिहरका गावचा रहिवासी आहे. मागील साडेतीन वर्षांपासून तो वाहतूक पोलिसांत कार्यरत आहे.