मध्य प्रदेशमध्ये भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. पुरी येथून बैतूल जाणाऱ्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना विशेष गाडी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे मालखेडी स्टेशनऐवजी आगासौद स्टेशनवर पोहोचली. गाडी दुसऱ्या ट्रॅकवर गेल्याचं समजल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. प्रवाशांमध्येही गोंधळ उडाला. सुदैवाने ट्रॅक खाली होता त्यामुळे कोणताही अपघात झाला नाही आणि गाडी सुरक्षितपणे आगासौद स्टेशनवर पोहोचली. त्यानंतर ट्रेनला पुन्हा ठराविक स्थानकावर रवाना करण्यात आलं. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या चुकीमुळे गाडीला जवळपास ४ तास उशीर झाला.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना विशेष गाडी सागर येथून सकाळी मालखेडी स्टेशनवर आली होती. सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी या गाडीला हिरवा सिग्नल मिळाला आणि गाडी पुढे निघाली, पण गाडी चुकीच्या ट्रॅकवरुन पुढे गेली होती. जवळपास अर्ध्यातासानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. तोपर्यंत बराच उशीर झाला होता आणि गाडी आगासौद स्टेशनवर पोहोचली, अखेर गाडीला त्याच स्टेशनवर थांबवण्यात आलं. जवळपास सव्वातास गाडी येथे उभी होती. त्यानंतर सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी मालखेडी स्टेशनसाठी गाडीला रवाना करण्यात आलं. अडीच तासानंतर गाडी येथे पोहोचली, मग गाडीच्या इंजिनची दिशा बदलून दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी गाडी बीना स्टेशनसाठी सोडण्यात आली. बीना स्टेशन प्रबंधक एमएस पिंका यांनी झांसी कंट्रोलच्या चुकीमुळे गाडी भलत्याच ट्रऐकवर गेल्याचं म्हटलं असून प्रखरणाची चौकशी सुरू आहे असं सांगितलं.