हुंड्यात रिक्षा न मिळाल्यामुळे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला व्हॉट्सअपवरच तिहेरी तलाक देऊन तिला चिमुकल्या मुलासह घरातून हाकलून दिल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. न्यायासाठी अखेर त्या २१ वर्षीय महिलेने पोलिसांकडे धाव घेतली आहे. सिरपूर कांकड परिसरात राहणाऱ्या आफरिन बी या पीडित महिलेने सांगितले की, हुंड्यात ऑटो रिक्षा न मिळाल्यामुळे माझा पती शाहरूख अन्सारीने काही दिवसांपूर्वी मला व्हॉट्सअपवर ऑडिओ मेसेज पाठवून मला तलाक दिला. त्याचबरोबर आपण दुसरे लग्न करणार असल्याचेही त्याने सांगितले. सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या पीडित आफरिन यांनी म्हटले की, विवाह झाल्यापासून माझ्या माहेरचे घरखर्चासाठी आम्हाला रोख रक्कम देत आहेत. पण आता माझ्या सासरच्या लोकांनी माझ्या पतीसाठी रिक्षा घेऊन द्या किंवा त्याला घरजावई करा रेटा धरला आहे.

आफरिनचा अन्सारीशी तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन वर्षांचा एक मुलगाही आहे. व्हॉट्सअपवर तिहेरी तलाक दिल्यानंतर ती आपल्या मुलासह माहेरी राहत आहे. आपल्याला पतीबरोबर राहायचे आहे. व्हॉट्सअपवर अशा पद्धतीने तीन तलाक देता येत नाही. मी या अन्यायाविरोधात कायदेशीर लढाई लढेन, असे आफरिनने म्हटले आहे.

दरम्यान, पोलिसांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. पोलीस अधीक्षक रुचितवर्धन मिश्रा यांनी सांगितले की, आम्ही आफरिनच्या माहेर व सासरकडील व्यक्तींची बैठक घेऊन सांमजस्याने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. जर त्यानंतरही सासरकडील मंडळींनी ऐकले नाही तर या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. दुसरीकडे आफरिनचे आजोबा इर्शाद हसन यांनी पोलिसांप्रती नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही पोलीस ठाण्याला चकरा मारून निराश झालो असल्याचे ते म्हणाले. कोणत्याही कारणाशिवाय व्हॉट्सअपवर तीन तलाक देऊन आपल्या पत्नीला सोडणे हे शरियतच्या विरोधात असल्याचे त्यांनी ते म्हणाले.