खासदारांना धुम्रपान करता यावे यासाठी संसदेत तयार करण्यात आलेल्या ‘स्मोकिंग झोन’वर तंबाखूविरोधी मोहिम राबवणाऱया सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.
सार्वजनिक परिसरात धुम्रपान करण्यावर बंदी असून तंबाखूविरोधी कायद्यानुसार संसदेचाही धुम्रपान निषिद्ध स्थळांमध्ये समावेश होतो. त्यामुळे अशी परवानगी देणे कायद्याचा भंग करणारे ठरेल, या आशयाचे पत्र सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना पाठवले आहे.
धुम्रपानासाठी संसदेत एक जागा असावी अशी काही खासदारांनी केलेली मागणी मान्य करण्यात आली होती. त्यानंतर संसदेच्या आत सेंट्रल हॉललगतचा प्रतिक्षा गृह सध्या ‘स्मोकिंग झोन’ म्हणून वापरात आहे. यावर तंबाखूविरोधी मोहिम राबवणाऱया कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. खुद्द संसदेकडून कायद्यांचे पालन होत असेल तर हे अतिशय दुर्देवी ठरेल. ज्या संसदेने कायदा तयार केला त्याच संसदेने कायदे पाळले नाहीत, तर समाजासमोर चुकीचा पायंडा घातला जाईल, असे सामाजिक संघटनांनी म्हटले आहे.