भारत आणि इस्राएलने संयुक्तपणे विकसित केलेल्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या नव्या क्षेपणास्त्राची भारताने गुरुवारी येथील संरक्षण दलाच्या तळावरून यशस्वी चाचणी केली.

मध्यम पल्ल्याचे एमआर-एसएएम हे क्षेपणास्त्र भारत आणि इस्राएलने विकसित केले असून त्याची चांदीपूरच्या एकात्मिक चाचणी तळावरून मोबाइल लॉन्चरच्या साहाय्याने यशस्वी चाचणी घेण्यात आली, असे डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पडली आणि त्याने सर्व लक्ष्य साध्य केली. रडारवरून संकेत मिळाल्यानंतर एकात्मिक चाचणी तळाच्या पॅड-३ वरून क्षेपणास्त्र सोडण्यात आले आणि त्याने हवेत फिरणाऱ्या लक्ष्याचा अचूक भेद केला. बंगालच्या उपसागरात मानवरहित हवाई यंत्र ‘बन्सी’ याने त्यासाठी सहकार्य केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या क्षेपणास्त्रासह बहुकार्य पाहणी आणि धोक्याची सूचना देणारी रडार यंत्रणाही (एमएफ-एसटीएआर) आहे. एमएफ-एसटीएआर यंत्रणेसह असलेल्या क्षेपणास्त्रात कोणताही हवाई हल्ला थोपविण्याची क्षमता आहे, असेही डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. इस्राएलच्या सहकार्याने भारतीय संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेने हे क्षेपणास्त्र विकसित केले असून त्यामुळे प्रतिवर्षी १०० क्षेपणास्त्रे उत्पादन होणारी सुविधा स्थापन करण्यात आली आहे. मे. भारत डायनामिक्स लि. भारत येथे उत्पादन केले जाणार आहे. या क्षेपणास्त्राची बुधवारी चाचणी घेण्यात येणार होती ती गुरुवापर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.