अत्याधुनिक अशा ‘राफेल’ फायटर विमानांचा आज इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समारंभपूर्वक समावेश करण्यात आला. अंबाला एअर बेसवर झालेल्या सोहळयात ‘राफेल’ फायटर विमाने भारतीय वायू दलाचा भाग झाली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने ट्विट करत राफेलच्या समावेशावर आनंद व्यक्त केला आहे.
इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात ही शक्तिशाली विमाने आल्याने त्यांची मारक क्षमता आणखी वाढणार आहे असे धोनीने म्हटंले आहे. महेंद्रसिंह धोनीने भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटबरोबर एक महिन्यापेक्षा जास्त काळ प्रशिक्षण घेतले आहे.

“जगातील सर्वोत्कृष्ट लढाऊ ४.५ जनरेशनच्या विमानांना जगातील सर्वोत्कृष्ट पायलट मिळाले आहेत. आमच्या वैमानिकांच्या हातात भारतीय वायुसेनेच्या वेगवेगळ्या विमानासोबत ही शक्तिशाली विमाने आल्याने त्यांची क्षमता आणखी वाढेल” असे धोनीने म्हटले आहे.

“ग्लोरियस १७ स्क्वाड्रन (गोल्डन एरो)चे अभिनंदन आणि शुभेच्छा. आशा आहे की, राफेल विमाने मिराज २००० विमानांच्या सर्व्हिस रेकॉर्डला मागे टाकतील. पण सुखोई एमकेआय ३० हे नेहमीच माझे आवडतं विमान राहिल. राफेलच्या येण्याने हवेत डॉगफाइटसाठी वैमानिकांना नवीन टार्गेट मिळालेय. सुखोई अपग्रेड होईपर्यंत बीव्हीआर डॉगफाइटसाठी थोडे थांबावे लागले” असे धोनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटंले आहे.

अंबाला एअर बेसवर झालेल्या कार्यक्रमात भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली, IAF प्रमुख आर.के.भदौरिया, सीडीएस बिपीन रावत, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि फ्रान्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.