एकीकडे वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झालेली असताना दुसरीकडे अष्टपैलू खेळाडू माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला भारतीय लष्करासोबत प्रशिक्षणासाठी परवानगी मिळाली आहे. स्वतः लष्करप्रमुख बिपिन रावत यांनीच धोनीला यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे धोनी आता पुढील काही दिवस लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंट बटालिअनसोबत प्रशिक्षण घेणार आहे.

या विशेष प्रशिक्षणासाठी धोनी जम्मू-काश्मीरला जाणार असल्याचेही सुत्रांकडून कळते. मात्र, लष्कराने धोनीला सक्रीय मोहिमेत सहभागी होण्याची परवानगी नाकारली आहे. लष्करातील बड्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

धोनीच्या निवृत्तीवरुन सध्या बरीच उलट-सुलट चर्चा सुरु आहे. धोनीच्या निवृत्तीवरुन क्रिकेटप्रेमींमध्ये मोठया प्रमाणावर मतभिन्नता आहे. दरम्यान, धोनीने दोन दिवसांपूर्वी आपण पुढचे दोन महिने उपलब्ध नसल्याचे बीसीसीआयला कळवले होते. त्यामुळे पुढच्या महिन्यांत होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यात धोनीचा संघात समावेश होणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता तो लष्करासोबत प्रशिक्षण घेणार असल्याने दोन महिने उपलब्ध नसणार हे देखील निश्चित झाले आहे.