राजनाथसिंह यांची ग्वाही, हमीभाव कायम राहणार असल्याचा पुनरुच्चार

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघटनांचे आंदोलन पाचव्या आठवडय़ात अधिकाधिक उग्र होत असताना संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी सरकारची भूमिका मांडली. शेतमालासाठी असलेला  हमीभाव रद्द करण्याचा केंद्राचा कधीही हेतू नव्हता असे सांगतानाच, शेतकऱ्यांपासून त्यांची शेतजमीन कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले. ‘कोणी मायेचा पूत शेतकऱ्यांची जमीन बळकावू शकत नाही’, अशा आक्रमक शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना सरकारतर्फे आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आघाडीवर आलेल्या राजनाथसिंह यांनीही यानिमित्ताने विरोधकांवर हल्ला चढवला. ज्यांना शेतीबाबत शून्य ज्ञान-जाणकारी आहे, ते भोळ्याभाबडय़ा शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत हे मोठे दुर्दैव आहे, अशी टीका त्यांनी केला. शेतकऱ्यांचा किमान  आधारभूत  दर योजना थांबविण्याचा आमच्या सरकारचा कधीही हेतू नव्हता आणि तो यापुढील काळातही नसेल. बाजार समित्यांची व्यवस्थाही कायम ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या राज्यव्यापी मेळाव्यात राजनाथसिंह बोलत होते.

नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, पण काँग्रेस त्यांची दिशाभूल करीत आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांची कमाई दुप्पट होणार आहे. या समग्र सुधारणांचा परिणाम दिसून येण्यासाठी काही काळ जावा लागेल, असा दावा राजनाथसिंह यांनी केला. १९९१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी केलेल्या सुधारणा असोत, की वाजपेयी सरकारच्या काळातील धोरणे असोत, त्यांचे सकारात्मक परिणाम  दिसून येण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी जावा लागला, असे त्यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे नव्या कायद्यांचा शेतकऱ्यांनी प्रयोग म्हणून एक-दोन वर्षे अनुभव घ्यावा, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

शेतकऱ्यांचे थाळीवादन

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. त्यावेळी सिंघू सीमेवर जमलेल्या तसेच इतर ठिकाणच्या आंदोलक शेतकऱ्यांनी थाळीवादन करून पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले.

नव्या कायद्यांचे लाभ सांगणारा एकही केंद्रीय नेता नाही- केजरीवाल

नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे कसे आहेत, हे समजावून सांगणारा एकही सत्तारूढ केंद्रीय नेता आपल्याला भेटलेला नाही, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केली. सिंघू सीमेवरील सफर-ई-शहादत कीर्तन दरबारात जमलेल्या शेतकऱ्यांशी बोलताना केजरीवाल यांनी भाजप नेत्यांवर ही टीका केली. कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे, मग त्यांनी त्यांच्यातील सर्वात मोठा नेता, ज्याला या कायद्यांची माहिती आहे, त्याला शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पाठवावे, अशी आपली सूचना असल्याचे केजरीवाल म्हणाले. या कायद्यांमुळे केवळ भांडवलदारांचा फायदा होईल, या दाव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.