सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी एमटीएनएल आणि बीएसएनएलच्या दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यातील कार्यालयांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी मंगळवारी केंद्र सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे. याव्यतिरिक्त आगीच्या घटना रोखण्यासाठी आपल्या इमारतीचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या प्रकरणांच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले.

22 जुलै रोजी एमटीएनएलच्या वांद्रे येथील तर बीएसएनएलच्या कोलकात्यातील सॉल्ट लेक परिसरातील इमारतींना आग लागल्याची घटना घडली होती. तर दिल्लीतील एमटीएनएलच्या इमारतीतही छोटी आग लागल्याची घटना घडली होती. दरम्यान, या घटनांमध्ये अग्निशमन दलाने त्वरित धाव घेत आगीला नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती. सध्या आगीचे कारण अस्पष्ट असले तरी या घटनेचा तपास सुरू आहे. तसेच या घटनानंतर एमटीएनएल आणि बीसएसएनएलने ग्राहकांना नेटवर्कमध्ये कोणतीही असुविधा होऊ नये यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे.

वांद्रे येथील महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) कंपनीच्या नऊ मजली इमारतीला सोमवारी दुपारी आग लागली. इमारतीतील वातानुकूलन यंत्राने पेट घेतला आणि संपूर्ण इमारत धुराने वेढली. आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचा जवान जखमी झाला. इमारतीच्या गच्चीवर अडकलेल्या ८५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुखरूप खाली उतरवले. सागरी सेतूच्या अलीकडे वांद्रे पश्चिमेकडे उतरणाऱ्या उड्डाणपुलाशेजारी ही इमारत आहे. दुपारी दोनच्या सुमारास इमारतीच्या लेखा विभागातील वातानुकूलन उपकरणाने पेट घेतला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमुळे या विभागातील बहुतांश कर्मचारी जेवणासाठी बाहेर होते. विभागात उपस्थित कर्मचाऱ्यांनी अग्निशामक उपकरणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग भडकली. वीज वाहिन्यांसह लाकडी साहित्य आणि कागदपत्रांनी पेट घेतला आणि नोंदणी विभागातही आग पसरत गेली. आग नियंत्रणाबाहेर गेल्याने कर्मचाऱ्यांनी अन्य सहकाऱ्यांना साद घालत खाली धाव घेतली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा फौजफाटा इमारतीजवळ पोचला. जवानांनी अंदाज घेत मागच्या-पुढच्या बाजूने अद्ययावत शिडय़ा लावून गच्चीत अडकलेल्यांसाठी बचावकार्य सुरू केले. तर दुसऱ्या पथकाने इमारतीच्या आत शिरून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेची उच्च स्तरावर चौकशी करण्याची मागणी खासदार पूनम महाजन केंद्रीय संचार मंत्रालयाकडे पत्राद्वारे केली होती. इमारतीतील अग्निशमन यंत्रणेचे पालिकेकडून परीक्षण झालेले नाही. इमारतीत आपत्कालीन सूचना यंत्रणेसह आग विझविण्यासाठी पुरेशा साधनांची कमतरता असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये दिसून आले आहे. तसेच आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावे, याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिलेले नाही वा एकदाही मॉक ड्रिल केलेले नाही, असेही समजते. ही इमारत वर्दळीच्या ठिकाणी असल्याने अशी दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी उच्च स्तरावर चौकशी करावी, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले होते.