महानगर टेलिफोन निगमच्या कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याचे पगार थकले आहेत. ते देण्यासाठी आता MTNL ने २५० कोटीचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महानगर टेलिफोन निगमने निविदा मागवल्या आहेत. या निविदेनुसार एमटीएनएलने एक वर्षाचा नियत अवधी किंवा त्यापेक्षा कमी नसलेला अवधी अशी तरतूद ठेवून २५० कोटींचे अल्प मुदतीचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. १२ डिसेंबर २०१८ ही निविदांसाठीची शेवटची तारीख आहे.

एअर इंडियापाठोपाठ MTNL वरही आर्थिक दिवाळखोरीची वेळ आली आहे. निधीच्या कमतरतेमुळे एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार दिला जाणार नाही अशी माहिती मुंबई आणि दिल्लीच्या कार्यकारी संचालकांनी पत्रकाद्वारे दिली होती. आता पगारासाठी एमटीएनएलने २५० कोटीचे कर्ज मागवण्याचे केल्याचे समजते आहे.

अवश्य वाचा: MTNL कर्मचाऱ्यांना नाही मिळणार नोव्हेंबर महिन्याचा पगार 

एमटीएनएलच्या लँडलाईनपेक्षा मोबाइल स्वस्त असल्यामुळे एमटीएनएलची ग्राहक संख्या मोठया प्रमाणात कमी झाली आहे. सध्या दूरसंचार क्षेत्रात जिओच्या प्रवेशामुळे मोठी स्पर्धा सुरु आहे. अनेक आघाडीच्या खासगी मोबाईल कंपन्यांही स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सुरु असलेल्या दर युद्धात दूरसंचार कंपन्यांच्या नफ्याचे गणित पार बिघडले आहे. त्यातही सरकारी कंपनी असलेल्या एमटीएनएलला जास्त झळ बसल्याचे सूचित होत आहे.