काश्मीर प्रश्नावर मध्यस्तीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानावरुन सध्या देशातील राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ सुरु आहे. मंगळवारी लोकसभेत यावरुन विरोधकांनी मोठा गोंधळ घातला आणि पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणाची मागणी करीत सभागृहातून काढता पाय घेतला. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी देशाला खरं काय ते सांगाव, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटकरुन म्हटले की, काश्मीर प्रश्नी भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला विनंती केली होती असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला आहे. जर हे खरे असेल तर मोदींनी भारताचे हितसंबंध आणि शिमला कराराची फसवणूक केली आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण देऊन उपयोग नाही. तर खुद्द पंतप्रधानांनीच देशाला सांगायला हवे की, ट्रम्प आणि त्यांच्यात काय चर्चा झाली. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी आपले ट्विट मोदींना नव्हे तर ट्रम्प यांना टॅग केले आहे.

काश्मीरचा प्रश्न हा केवळ भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांचा मुद्दा असून आम्ही आमच्या पूर्वीच्या दाव्यावर ठाम आहोत. त्यामुळे या संबंधीच्या सर्व समस्यांचा निपटारा भारत-पाकिस्तान मिळून करतील. आम्ही शिमला-लाहोर करारावरुनच पुढे जाण्यास प्रतिबद्ध आहोत. काश्मीर मुद्द्यावर तोडगा हा द्विपक्षीयच असू शकतो. त्यात तिसऱ्याने येण्याची गरज नाही. यावर आम्ही शांततापूर्ण मार्गांनीच समाधान काढणार आहोत, असे आज संसदेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर काँग्रेस आणि विरोधी पक्ष देखील संसदेत आक्रमक झाले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात येऊन यावर स्पष्टीकरण द्यावं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यावर विश्वास आहे असे आमचे म्हणणे नाही, मात्र पंतप्रधानांनी आपली बाजू मांडायला हवी, असे आझाद यांनी म्हटले होते. पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणाची मागणी करीत विरोधकांनी सभात्यागही केला.