अमेरिकेत २०१६ मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याच्या आरोपाची विशेष सरकारी वकिलांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून न्यायप्रक्रियेत अडथळा आणण्यात आला का, यासंदर्भात त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे, असे वृत्त माध्यमांनी दिले आहे.
एफबीआयचे माजी प्रमुख रॉबर्ट म्युएलर यांची विशेष वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासामध्ये म्युएलर यांनी, रशियाचा हस्तक्षेप होता का, यावर भर दिला. ट्रम्प यांचा प्रचार करणारा गट आणि क्रेमलिन यांच्यात लागेबांधे होते का, याचाही तपास केला जाणार आहे, असे वृत्त द वॉशिंग्टन पोस्टने दिले आहे.
ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी काही आर्थिक गैरव्यवहार केले आहेत का, या बाबतच्या पुराव्यांचाही शोध घेण्यात येत असल्याचे वृत्त दैनिकाने दिले आहे. राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेचे विद्यमान संचालक डॅनिअल कोट्स, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख माइक रॉजर्स आणि रॉजर्स यांचे माजी सहकारी रिचर्ड लेजेट यांनी चौकशीला सामोरे जाण्याचे मान्य केले आहे. या तिघांची चौकशी करण्याची इच्छा म्युएलर यांनी व्यक्त केली असल्याचे वृत्त द न्यूयॉर्क टाइम्सनेही दिले आहे.
ही चौकशी गुप्तपणे केली जात असून एफबीआय आणखी किती जणांची चौकशी करणार आहे ते स्पष्ट झालेले नाही. जेम्स कॉमी यांची एफबीआयच्या संचालकपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर, ट्रम्प यांनी न्यायप्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला का, याची चौकशी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असे वृत्तही दैनिकाने दिले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 16, 2017 3:47 am