एरिक्सन इंडियाला द्यावयाचे ४५८. ७७ कोटी रुपये भरण्यात अखेर अनिल अंबानी यांना यश आले आहे. ही रक्कम भरल्याने अनिल अंबानी यांची अटकही टळली आहे. यानंतर अनिल अंबानी यांनी मोठा भाऊ मुकेश अंबानी आणि नीता यांचे आभार मानले आहेत. कठीण प्रसंगात मला साथ दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे अनिल अंबानी यांनी म्हटले आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्स विरोधात एरिक्सन इंडियाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ध्वनिलहरीपोटी रिलायन्स कम्युनिकेशन्स स्विडनच्या एरिक्सनला ५५० कोटी रुपये देणे होती. या पैकी काही रक्कम यापूर्वी जमा करण्यात आली आहे. उर्वरित रकमेकरिता सर्वोच्च न्यायालयाने अंबानी व त्यांच्या कंपनीला १९ मार्चपर्यंतची मुदत दिली होती.

मंगळवारी मुदत संपण्यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन्सने एरिक्सनला ४५८.७७ कोटी रुपये दिले. रक्कम मुदतीत न भरल्यास तुरुंगात टाकण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अंबानी यांना बजाविले होते. कंपनीने ही रक्कम न भरल्यास अंबानी यांना किमान तीन महिन्यांच्या शिक्षेला सामोरे जावे लागले असते.  मंगळवारी कोर्टात पैसे जमा केल्यानंतर अनिल अंबानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंबानी कुटुंबात दोन्ही भावांमध्ये वाद झाला होता. मात्र, संकटसमयी मुकेश अंबानी यांनी अनिल अंबानी यांना मदत केल्याचे समोर आले आहे. मंगळवारी कोर्टात पैसे जमा केल्यानंतर अनिल अंबानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल अंबानी म्हणतात, मी आणि माझे कुटुंब भूतकाळातून बाहेर पडलोय. माझा मोठा भाऊ मुकेश आणि वहिनी नीता हे दोघे कठीण काळात माझ्या पाठिशी उभे राहिले. या मदतीसाठी मी आभारी आहे. अशा प्रसंगात मदत करुन त्यांनी कुटुंबाचे महत्त्व आणि कुटुंबातील मूल्य हे अधोरेखित केले. आम्ही जुन्या गोष्टी विसरुन आता पुढे जात आहोत. त्यांच्या या वागणुकीमुळे मी खरंच प्रभावित झालो आहे, असे अनिल अंबानी यांनी म्हटले आहे.