स्पर्धकांना स्पर्धेतून बाद करण्यासाठी आता मुकेश अंबानींकडून रिलायन्स जिओमध्ये आणखी ४.४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कव्हरेज वाढवण्यासाठी रिलायन्स समूहाकडून ही नवी गुंतवणूक जिओमध्ये करण्यात येणार आहे. रिलायन्स जिओकडून ग्राहकांना देण्यात येत असलेल्या मोफत सेवेचा फटका दूरसंचार क्षेत्रातील सेवेला बसत असल्याची तक्रार स्पर्धकांकडून केली जाते आहे. त्यातच आता रिलायन्सकडून जिओमध्ये आणखी गुंतवणूक केली जाते आहे. जिओ सुरू केल्यापासून आतापर्यंत रिलायन्सने या कंपनीत २५ अब्ज कोटींची गुंतवणूक केली आहे.

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडमध्ये रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडकडून ४.४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे. नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्यात येणार आहे. ‘सध्या रिलायन्स जिओला दिवसाकाठी ६ लाख नवे ग्राहक मिळत आहेत. याशिवाय जिओच्या सेवेला सुरुवात झाल्यानंतर चार महिन्यांमध्ये कंपनीकडे सव्वा सात कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत,’ अशी माहिती रिलायन्स जिओने दिली आहे.

रिलायन्स जिओमुळे करण्यात आलेल्या नव्या गुंतवणुकीमुळे कंपनीला ग्राहकांना कायमस्वरुपी मोफत कॉल्स आणि मार्चपर्यंत मोफत इंटरनेट सेवा देता येणार आहे. रिलायन्स जिओच्या मोफत सेवेमुळे दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धेला फटका बसत आल्याची तक्रार एअरलेटकडून राष्ट्रीय लवादाला करण्यात आली आहे.

‘रिलायन्सला दूरसंचार कंपन्यांच्या खेळातील छोटा स्पर्धक राहायचे नाही. त्यांना लवकरात लवकर पहिले स्थान काबीज करुन दिर्घकाळासाठी ते स्थान टिकवायचे आहे,’ असे ब्लूमबर्गच्या ऍनालिस्ट अँथेआ लाय यांनी म्हटले आहे. ‘यामुळे इतर स्पर्धकांना धक्का बसला आहे. स्पर्धेलाही धक्का बसला आहे. मात्र दूरसंचार क्षेत्रात पहिला क्रमांक मिळवण्यासाठी रिलायन्स जिओचे प्रयत्न सुरू आहेत,’ असेही लाय यांनी म्हटले आहे.

रिलायन्स समूहाला ऑईल आणि पेट्रोकेमिकल्समधून सर्वाधिक नफा मिळतो. रिलायन्सच्या सर्व उद्योगांचा विचार केल्यास ऑईल आणि पेट्रोकेमिकल्स समूहाला सर्वाधिक नफा मिळवून देण्यात आघाडीवर आहेत. याच कंपन्यांमधून मिळणारे उत्पन्न रिलायन्सकडून इतर कंपन्यांमध्ये गुंतवले जाते. त्यामुळेच ऑईल आणि पेट्रोकेमिकल्समधून मिळणारे मोठे उत्पन्न कंपनीने जिओमध्ये गुंतवले आहे. दूरसंचार क्षेत्रातील व्होडाफोन, एअरटेलसारख्या कंपन्यांना मागे टाकण्यासाठी रिलायन्स जिओने मार्चच्या अखेरपर्यंत फोन कॉल्स, व्हिडीओ कॉल्स, ४जी इंटरनेट सेवा मोफत दिल्या आहेत.