अदानी समुहाचे सर्वेसर्वा उद्योजक गौतम अदानी यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या नव्या यादीमध्ये देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानी आहेत. तर या यादीमध्ये अदानींने आठ स्थानांची झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे.

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार ६२ वर्षीय मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही ५१.४ बिलियन डॉलर (अंदाजे ३ लाख ७० हजार कोटी) इतकी आहे. तर दुसऱ्या स्थानी असणाऱ्या अदानी यांची संपत्ती १५.७ बिलियन डॉलर (अंदाजे १ लाख १५ हजार कोटी) इतकी आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या दहामध्ये उद्योजक हिंदूजा बंधू, बांधकाम क्षेत्रातील पलोनजी मिस्त्री, बँकर उदय कोटक, तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे नाव असणारे शीव नादार, गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानिया, गोदरेज कुटुंबिय, पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल, उद्योजक कुमार बिर्ला यांचा समावेश आहे.

तर देशातील १०० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये सहा जणांचा पहिल्यांदाच समावेश झाला आहे. यामध्ये बायजू या अॅपचे संस्थापक बायजू रविंद्रन, हल्दीरामचे मनोहर लाल आणि मधुसूदन अग्रवाल, टाइल्स व अन्य उत्पादने करणारी जॅग्वार या कंपनीचे मालक राजेश मेहरा यांचा पहिल्यांदाच अव्वल १०० श्रीमंतांमध्ये समावेश झाला आहे.

भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी अझीम प्रेमजी यांची दुसऱ्या स्थानावरुन १७ व्या स्थानावर घसरण झाली आहे.  मार्च महिन्यामध्ये प्रेमजी यांनी गरीब, वंचितासाठी देण्यात येणाऱ्या देणगीमध्ये तब्बल ५२,७५० कोटी रुपयांची वाढ केल्याने श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये त्यांची पडझड झाली आहे. प्रेमजी यांच्या या निर्णायामुळे त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या एकूण देणगीची रक्कम १ लाख ४५ हजार कोटी रुपये इतकी झाली. समाजसेवासाठी देण्यात येणाऱ्या देणगीमध्ये त्यांनी बिल गेट्स यांनाही मागे टाकले आहे. आपली ५० टक्के संपत्ती दान करू अशी घोषणा काही वर्षांपूर्वी अझीम प्रेमजी यांनी केली होती. त्यानुसार व्हिप्रोच्या नफ्यातील मोठा वाटा ते अझीम प्रेमजी फाउंडेशनला दान करतात.