मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सला एका दिवसात थोड्या थोडक्या नाही ७ बिलियन डॉलर्सचा फटका बसला आहे. करोना काळातही रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स तेजीत होते. मात्र सोमवारी रिलायन्सचे शेअर्स ८.६ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे रिलायन्सला एका दिवसात ७ बिलियन डॉलर्सचा तोटा झाला आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या अहवालानुसार गेल्या सात महिन्यातली ही सगळ्यात मोठी घसरण आहे.

भारतातील एक बलाढ्य व्यावसायिक कंपनी अशी ओळख असलेल्या रिलायन्सचे शेअर्स ८.६ टक्के घसरले. २३ मार्च २०२० नंतर रिलायन्सच्या शेअर्समधली ही सर्वात मोठी घसरण आहे. सोमवारी सेन्सेक्सचा आलेख तर उंचावला. पण रिलायन्ससाठी हा सोमवार आर्थिक नुकसान करणारा ठरला. खराब कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये रिलायन्सचंही नाव होतं त्यामुळे रिलायन्सचे शेअर्स ८.६ टक्क्यांनी घसरले.

रिलायन्सने स्टॉक एक्स्चेंजला सांगितलं की जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा ९ हजार ५६७ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी हाच नफा ११ हजार २६२ कोटी इतका होता. कंपनीच्या टेलिकॉम बिझनेसने या दरम्यान चांगली कामगिरी केली. ७३ लाख सबस्क्राईबर कंपनीने जोडले. मात्र सप्टेंबरच्या तिमाही रिलायन्सला १५ टक्के तोटा झाला त्यामुळे त्यांचे शेअर्स पडले. दुसऱ्या तिमाहीवर करोनाचा प्रभाव पडल्याने हे नुकसान झाल्याचंही कंपनीने म्हटलं आहे. रिलायन्स हे व्यवसाय क्षेत्रातलं इतकं मोठं नाव आहे त्यामुळे करोना काळातही त्यांचे शेअर्स तेजीत होते. मात्र सोमवारी या शेअर्समध्ये ८.६ टक्के घसरण पाहण्यास मिळाली. त्यामुळे एका दिवसात रिलायन्सला ७ बिलियन डॉलर्सचा फटका बसला आहे.