महाराष्ट्रात व्यावसायिक गुंतवणूक करण्याची क्षमता संपलेली आहे. त्यामुळे आता उद्योगांनी गुंतवणुकीसाठी भारतातील इतर राज्यांचा विचार करावा, असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले. त्या मंगळवारी बंगाल आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आहे, या गोष्टीचा मी पूर्णपणे आदर करते. मात्र, आता त्या राज्याची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे उद्योगांनी देशाच्या इतर भागांमध्ये गुंतवणूक करावी. त्यासाठी पश्चिम बंगाल हा उत्तम पर्याय आहे. पश्चिम बंगालच्या सीमेला लागून बांगलादेश, नेपाळ, भुतान हे देश आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारलाही चिमटे काढले. आमच्या राज्यात भेदभाव आणि दहशतीला थारा नाही. याठिकाणी तुम्हाला प्रेम आणि आपुलकीचा अनुभव येईल. पश्चिम बंगाल कोणाचाही हक्क हिरावून घेणार नाही, याची शाश्वती मी तुम्हाला देते. आम्हाला देशाची एकता आणि सहिष्णुता प्रिय आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल गुंतवणुकीसाठी आदर्श ठिकाण ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.

या परिषदेत भाषण करताना रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबांनी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले. उद्योगस्नेही धोरणांच्याबाबतीत पश्चिम बंगाल हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रिलायन्स आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये ५००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. डिसेंबर २०१८ च्या अखेरपर्यंत जिओ नेटवर्क पश्चिम बंगालमधील प्रत्येक भागात पोहोचेल. तसेच संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये ऑप्टिकल फायबर केबल्सचे जाळे तयार करण्याची आमची योजना आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि अन्य ठिकाणी जिओची इंटरनेटसेवा पुरवणे शक्य होईल. याशिवाय, रिलायन्स समूह रिटेल आणि पेट्रो उत्पादनांशी संबंधित उद्योगांच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये ५००० कोटींची गुंतवणूक करेल, असे मुकेश अंबानी यांनी सांगितले.