प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ब्रिटनमधील खेळण्याची कंपनी हॅमलेज ( Hamleys )ला खरेदी केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने यासाठी तब्बल ६७.९६ मिलियन पौंड म्हणजेच ६२० कोटी रूपये मोजले आहेत.

हॅमलेज या कंपनीची स्थापना लंडनमध्ये १७६० मध्ये झाली. हॅमलेज हा लहान मुलांच्या खेळण्यांचा प्रसिद्ध ब्रँड असून याचे १८ देशांत उत्पादने विकली जातात. त्यात चीन, जर्मनी, रशिया, भारत, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व इथे कंपनीची स्टोअर्स आहेत. हॅमलेजचा भारतामध्ये विक्रीसाठी रिलायन्ससोबत करार होता. त्याअंतर्गत भारतातील २९ शहरांमध्ये हेमलेजची ८८ दुकानं आहेत.

हॅमलेज २५९ वर्ष जुनी ब्रिटिश कंपनी आहे. गेल्या काही वर्षांपासून नफा मिळवण्यात अपयश येत असल्यामुळे हॅमलेज आपली मालकी विकायचा निर्णय घेतला. हॅमलेजची मालकी सध्या हाँगकाँगच्या सी बॅनर आंतरराष्ट्रीय होल्डिंग्स या कंपनीकडे आहे. सी बॅनरनं २०१५ मध्ये हॅमलेज खरेदी केली होती. ही खरेदी १०० मिलियन पाऊंडला झाली होती. गुरूवारी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि सी बॅनर आंतरराष्ट्रीय होल्डिंग्स यांनी याबाबत करारावर हस्ताक्षर केले आहेत. या करारानुसार ‘हॅमलेज ग्लोबल होल्डिंग्स लिमिटेड’ या कंपनीत १०० टक्के भागीदार करून रिलायन्सने ही कंपनीच अधिग्रहित केली आहे.