रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये जगातील विविध आघाडीच्या कंपन्यांची गुंतवणूक सुरूच आहे. आता ‘Intel Capital’ ही कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्मसकडून आज याबाबत माहिती देण्यात आली.

‘इंटेल कॅपिटल’ जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 1,894.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासोबतच गेल्या दोन महिन्यांमध्ये जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करणारी इंटेल कॅपिटल ही 11 वी कंपनी ठरेल. तर, जिओमध्ये होणारी ही 12 वी गुंतवणूक असणार आहे.   1,894.50 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे इंटेल कंपनीला जिओमध्ये 0.39 टक्क्यांची हिस्सेदारी मिळेल. जगभरात दर्जेदार कॉम्प्युटर चिप बनवण्यासाठी इंटेल कंपनीची ओळखली जाते.

या गुंतवणूकीसोबतच गेल्या दोन महिन्यांमध्ये जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये जगातील विविध आघाडीच्या कंपन्यांकडून झालेल्या गुंतवणूकीचा आकडा 1,17,588.45 कोटी रुपये होईल. सर्वात आधी फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये फेसबुकनं 43 हजार 574 कोटी रूपयांची गुंतवणूक करत 9.99 टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. फेसबुकच्या गुंतवणुकीनंतर टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्व्हरलेकनं 5,665.75 कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह जिओमधील 1.15 टक्के हिस्सा खरेदी केला. त्यानंतर विस्टा इक्विटी पार्टनर्सनं जिओमधील 2.32 टक्के हिस्सा खरेदी केला होता. याअंतर्गत त्यांनी कंपनीत 11,367 कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. तसंच न्यूयॉर्कमधील खासगी इक्विटी कंपनी जनरल अटलांटिकनं 6,598.38 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती दिली होती. यासोबतच केकेआरनंदेखील 11 हजार 365 कोटी रूपयांची गुंतवणूक करून जिओमधील 2.32 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. कोणत्याही आशियाई कंपनीत केकेआरनं केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक होती. नंतर पाच जून रोजी अबू धाबीच्या ‘मुबादला इन्व्हेस्‍टमेंट कंपनी’नेही जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 9,093.60 कोटी रुपयांची गुंतवणूक करत 1.85 टक्के हिस्सेदारी घेतली. त्याच दिवशी अमेरिकेच्या सिल्वर लेकने 0.93 टक्के हिस्सेदारीसाठी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये अजून 4,546 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर सात जून रोजी अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) या कंपनीने जिओमध्ये 5,683.50 कोटी रूपयांची गुंतवणूक करत 1.16 टक्के हिस्सेदारी घेतली. नंतर टीपीजी, L Catterton आणि PIF या तीन कंपन्यांनी जिओमध्ये अनुक्रमे 4,546 कोटी रुपये, 1, 894 कोटी रुपये आणि 11, 367 कोटी रुपये गुतचवले. तर आता इंटेल कॅपिटल जिओमध्ये 1,894.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.