मागच्याच महिन्यात इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा भव्य शाही विवाह सोहळा पार पडला. पुढचे काही महिने किंवा वर्ष माध्यमांमध्ये या विवाहाची चर्चा होत राहील. कारण दशकातील हा सर्वात मोठा डोळे दिपवून टाकणारा लग्नसोहळा ठरला. देशातील श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुलीच्या लग्नात कुठलाही कमतरता ठेवली नाही.

लग्नाच्या महिन्याभरानंतर आता इशा अंबानीने वोग्यू इंडिया नियतकालिकाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने तिच्याबद्दल माहित नसलेल्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. अंबानी कुटुंबात लहानाचे मोठे होतानाच अनुभव कसा होता हे सांगताना इशाने तिचा आणि जुळा भाऊ आकाश दोघांचा जन्म आयव्हीएफ तंत्राने झाल्याचे सांगितले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

लग्नानंतर सात वर्षांनी माझा आणि आकाशचा आयव्हीएफ तंत्राने जन्म झाला असे इशाने सांगितले. आमच्या जन्मानंतर आईने आमच्या संगोपनासाठी पूर्ण वेळ दिला. आम्ही पाच वर्षांचे झाल्यानंतर ती पुन्हा कामात सक्रिय झाली. अजूनही ती वाघिणीसारखी आमच्या पाठिशी असते असे इशाने मुलाखतीत सांगितले.

आज रिलायन्स जिथे आहे तिथवर पोहोचण्यासाठी स्वप्नांच्या पूर्ततेसाठी मेहनत, कष्ट करताना मी माझ्या वडिलांना पाहिले आहे. ते कामात कितीही व्यस्त असले तरी आम्हाला जेव्हा गरज असायची तेव्हा ते आमच्यासोबत असायचे असे इशाने सांगितले. आमचे आई-वडिल ज्या पद्धतीने लहानाचे मोठे झाले त्यांनी आम्हाला सुद्धा तीच मुल्य शिकवली. माणूसकी, कष्ट आणि पैशांची किंमत आम्हाला कळली पाहिजे याकडे त्यांनी लक्ष दिले असे इशाने सांगितले.