पाच तासांच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाकडून निकाल राखीव; समाजवादी पक्षाचे चिन्ह गोठविले जाण्याची चिन्हे

गेल्या पंचवीस वर्षांपासून साथ दिलेल्या ‘सायकल’ चिन्हासाठी मुलायमसिंह यादव आणि अखिलेशसिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गट शुक्रवारी निवडणूक आयोगासमोर आमनेसामने आले. मात्र, पाच तासांच्या सुनावणीनंतर आयोगाने निर्णय तूर्त राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, वेळेअभावी आणि कायदेशीर गुंतागुंत असल्याने आयोगाकडून ‘सायकल’ हे चिन्ह गोठविले जाण्याची चिन्हे आहेत. तसा निर्णय सोमवापर्यंत घेतला जाईल.

‘अशोका रोड’वरील ‘निर्वाचन सदन’वर शुक्रवार सकाळपासूनच मोठी गर्दी होती. आपल्या गटाचे नेतृत्व स्वत: मुलायमसिंह यादव करीत होते. त्यांच्या मदतीला बंधू शिवपालसिंह आणि काही आमदार होते. नेहमी मुलायमसोबत असणारे वादग्रस्त खासदार अमरसिंह आणि माजी खासदार जयाप्रदांची अनुपस्थिती जाणवणारी होती. दुसरीकडे मुख्यमंत्री अखिलेशसिंह हे स्वत: आले नाहीत; पण त्यांच्या गटाकडून काका रामगोपाल यादव, खासदार नरेश आगरवाल, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे चिरंजीव नीरज शेखर आदी मंडळी होती. विशेष म्हणजे, मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी यांच्या नेतृत्वाखालील आयोगासमोर अखिलेश यांच्या गटाची बाजू मांडत होते काँग्रेसचे नेते व प्रसिद्ध विधिज्ञ कपिल सिब्बल. अखिलेश यांच्या गटाची काँग्रेसबरोबरील युती जवळपास पक्की असल्याचा अर्थ त्यातून काढला जात आहे. माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मोहन पराशरन यांनी मुलायमांची बाजू मांडली.

अखिलेश यांच्या गटाने घेतलेले कथित राष्ट्रीय अधिवेशन व त्यात अखिलेश यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनविण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा दावा मुलायम यांच्यातर्फे केला गेला, तर ८० टक्क्यांहून अधिक खासदार, आमदार आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आमच्याकडे असल्याने आम्हीच ‘खरा समाजवादी पक्ष’ असल्यावर अखिलेश गटाचा भर होता. मात्र, अखिलेश यांच्या गटाने घेतलेल्या काही सहय़ा बनावट असल्याचा प्रतिआरोप मुलायम यांच्याकडून केला गेला. याशिवाय अनेक कायदेशीरदृष्टय़ा किचकट मुद्दे दोन्ही गटांनी मांडले. अखेरीस दोन्ही युक्तिवाद ऐकून आयोगाने तूर्त निकाल राखून ठेवला.

उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्याचे मतदान ११ फेब्रुवारीला आहे. त्यासाठी येत्या मंगळवारपासून (दि. १७) उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. तत्पूर्वी आयोगाला समाजवादी ‘सायकल’चा गुंता सोडवावा लागेल. त्यातच कोण्या एका गटाच्या बाजूने निकाल दिल्यास विरोधी गट न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत चिन्ह गोठविण्याचा पर्याय ‘सुरक्षित’ असल्याचे मानले जाते. तसेच संकेत आयोगाने दिले आहेत.

..तर मुलायम ‘शेतकऱ्यां’बरोबर अन् अखिलेश ‘मोटारसायकल’वर!  

‘न मला, न तुला..’ अशी वेळ येऊन ठेपल्याने ‘सायकल’ चिन्ह गोठविण्याची शक्यता पिता-पुत्राच्या गटांनी गृहीत धरली आहे. त्यामुळे दोघांनीही पर्यायाची (प्लान बी) जय्यत तयारी केल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, ‘सायकल’ पंक्चर झाल्यास मुलायमांचा गट दिवंगत चौधरी चरणसिंहांनी स्थापन केलेल्या लोकदलाच्या आश्रयास जाईल. नांगरणी करणारा शेतकरी आणि बलजोडी असे लोकदलाचे चिन्ह आहे. दुसरीकडे अखिलेश यांचा गट अखिल भारतीय समाजवादी पक्ष म्हणून स्वत:ला घोषित करेल आणि ‘मोटारसायकल’चे चिन्ह घेईल.