News Flash

तालिबानचे हंगामी सरकार; प्रमुखपदी मुल्ला हसन अखुंद

तालिबानचे सरकार हे इराणच्या धर्तीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

तालिबानचे हंगामी सरकार; प्रमुखपदी मुल्ला हसन अखुंद
मुल्ला हसन अखुंद

काबूल : अफगाणिस्तानात अमेरिकेच्या माघारीआधीच सत्ता काबीज केलेल्या तालिबानने अखेर सरकारची स्थापना केली आहे. आधी जाहीर केलेल्या मुदतीपेक्षा दोन दिवसांच्या विलंबाने हे हंगामी सरकार स्थापन झाले असून त्याचे नेतृत्व मुल्ला हसन अखुंद करणार आहेत. या  सरकारमध्ये मुल्ला बरादर हे उपप्रमुख असतील.

तालिबानचे सरकार हे इराणच्या धर्तीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानमध्ये सर्व महत्त्वाचे निर्णय करणारे सर्वोच्च नेते म्हणून रेहबारी शुराच्या प्रमुखपदी अखुंद यांची निवड झाली आहे.  नवे सरकार हंगामी असल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

सिराजउद्दीन हक्कानी हे अंतर्गत सुरक्षामंत्री असून मुल्ला याकूब यांना हंगामी संरक्षणमंत्री करण्यात आले आहे. अब्बास स्टॅनकझाई यांना नवीन अफगाण सरकारमध्ये हंगामी परराष्ट्र उपमंत्रिपद देण्यात आले आहे.

तालिबानी प्रवक्त्याने म्हटले आहे की, नवीन अफगाण सरकारचे हंगामी पंतप्रधान म्हणूनही अखुंद यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर मुल्ला अब्दुल घनी बरादर यांना हंगामी उपपंतप्रधान करण्यात आले आहे. अहमदुल्ला वासिक यांनी सांगितले की, औपचारिक सत्ताग्रहण समारंभाआधी आम्ही नवीन सरकारमधील काहींची नावे जाहीर करीत आहोत. संपूर्ण मंत्रिमंडळ पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येईल.

गेली वीस वर्षे अमेरिकेविरोधात लढलेल्या तालिबान्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. तालिबानच्या गेल्या सरकारमधील अंतरिम पंतप्रधान मुल्ला हसन अखुंद यांना तालिबान सरकारचे प्रमुख केले आहे तर अमेरिकेशी वाटाघाटीत सहभागी होऊन करारावर स्वाक्षऱ्या करण्यात सहभागी असलेले मुल्ला अब्दुल गनी बरादर यांची उपपंतप्रधानपदी नेमणूक करण्यात आली आहे.

तालिबान सरकारमध्ये सर्वाना प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाने केली असताना त्याची कुठलीही चिन्हे यात दिसलेली नाहीत.

तालिबानचे प्रवक्ते झबीउल्ला मुजाहिद यांनी मंत्रिमंडळाची घोषणा करताना सांगितले की, या नेमणुका अंतरिम आहेत. ते किती काळ काम हंगामी पद्धतीने काम करतील हे सांगता येत नाही. तालिबानने निवडणुका घेण्याचे कुठलेही संकेत दिलेले नाहीत.

काबूलमध्ये पाकिस्तानविरोधी निदर्शने

काबूल : काबूलमध्ये मंगळवारी पाकिस्तानविरोधात निदर्शने करणाऱ्यांना पांगविण्यासाठी तालिबानने गोळीबार केला. यावेळी  अनेक अफगाणी वार्ताहरांनाही अटक करण्यात आली, अशी माहिती तेथील उपस्थित तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींनी दिली.  येथील पाकिस्तानी दूतावासाबाहेर ही निदर्शने केली जात होती. अफगाणिस्तानात पाकिस्तान हस्तक्षेप करीत असल्याचा निदर्शकांचा आरोप असून त्याविरोधात त्यांनी हे आंदोलन केले. पंजशीर प्रांतातील तालिबानविरोधी योद्धय़ांना तालिबानने नुकतेच पराभूत केले. तालिबानला पाकिस्तानने मदत केल्याचे निदर्शकांचे म्हणणे आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 2:53 am

Web Title: mullah hassan akhund to lead the interim government of the taliban zws 70
Next Stories
1 बेळगावच्या निकालाची पुनरावृत्ती मुंबई महापालिकेत!
2 भाजपविरोधात ब्राह्मण-दलित बेरीज!
3 ‘करोना संसर्गामुळे लशीपेक्षा जास्त प्रतिकारशक्ती’
Just Now!
X