मोठमोठय़ा इमारती जशाच्या तशा उचलून हव्या तिथे नेऊन बसविण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविणाऱ्या हरियाणा येथील टीडीबीडी या अभियांत्रिकी कंपनीने येथील एक दुमजली इमारत सोमवारी यशस्वीरीत्या ५० फूट मागे सरकविली आह़े  कंपनीने गेल्या काही वर्षांच्या कार्यकाळात ३०० हून अधिक इमारतींचे पुनर्वसन केले असले, तरीही अशा प्रकारचे हे भारतातील पहिलेच काम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आह़े
या निवासी इमारतीचे मालक एम़  थांगवेलू यांना दुसरे एक बांधकाम करण्यासाठी त्यांचे राहते घर ५० फूट मागे सरकवायचे होत़े  त्यांनी टीडीबीडीशी संपर्क साधला़  कंपनीने आजवर १५० टनापर्यंतच्या इमारती सरकविल्या होत्या़  त्यामुळे ही ४०० टनांची इमारत सरकविणे आव्हानच होत़े  परंतु कंपनीने हे आव्हान स्वीकारत ३०० रोलर आणि इतर साहित्याच्या साहाय्याने ही कामगिरी फत्ते केली, अशी माहिती टीडीबीडीचे व्यवस्थापकीय संचालक सुशील सिसोदिया यांनी पत्रकारांना सांगितल़े  यासाठी सुमारे १८ ते २० लाख रुपये खर्च आल्याचेही त्यांनी सांगितल़े
सात खोल्या असलेल्या या जुन्या इमारतीच्या काही भिंती सरळ रेषेत नव्हत्या़  त्यामुळे इमारत पायासह सरकविणे हे आव्हानच होते, असे मुख्य अभियंता गुरप्रीत सिंग यांनी सांगितल़े.