जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना, श्रीलंकेची राजधानी कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. राजधानी कोलंबो शहरांमध्ये एकापाठोपाठ अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत. तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये लागोपाठ सहा स्फोट झाले. त्यानंतर दुपारी दोन स्फोट झाले. ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या या स्फोटांमधील मृत्यूचा आकडा  २०७ वर पोहचला आहे. तर ४५० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मृत्यांमध्ये ३५ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली घडली. एएफपीच्या वृत्तानुसार, कोलंबोमध्ये ४५, नेगोम्बो परिसरातील सेबेस्टियन चर्चमध्ये ६७ आणि  बाट्टिकालोआमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

राउटर्स या वृत्तसंस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने वृत्त दिले की, श्रीलंकेतील साखळी स्फोटांत आत्तापर्यंत २०७ जणांचा मृत्यू झाला असून ४५० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी ७ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.

राजधानीच्या कोलंबो शहरात पुन्हा एक आठवा बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने एएफपी या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या संरक्षण मंत्र्यांनी शहरात रात्रीच्यावेळी संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोलंबोत आणखी एक स्फोट झाला असून त्यात २ जणांचा मृत्यू झाला आहे.

स्फोटानंतर राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी शोक व्यक्त केला असून जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. पहिला स्फोट कोलंबो येथील सेंट अँटनी चर्च, दुसरा स्फोट कोलंबो शहराच्या बाहेर नेगोम्बो परिसरातील सेबेस्टियन चर्चमध्ये , तिसरा स्फोट पूर्वेकडील बाट्टिकालोआ चर्चमध्ये झाला. ज्या हॉटेलांमध्ये स्फोट झाले त्यात शांगरीला, द सिनामॉन ग्रँड आणि द किग्सबरी यांचा समावेश आहे.

बॉम्बस्फोटाबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करत भारतीय उच्चायुक्तांशी सतत संपर्कात असून, परिस्थितीवर नजर ठेवून असल्याची माहिती दिली आहे. श्रीलंकेतील भारतीय दूतावासाकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोलंबो शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यामध्ये अनेक निरापराध नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये विदेशी पर्यटकांचा समावेशही आहे.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार बट्टीकलोआ, कोच्छिकाडे आणि काटुवापिटिया येथील चर्चमध्ये स्फोट झाले आहेत. बट्टीकलोआ येथील चर्चमध्ये स्फोट झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.