मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याची शुक्रवारी पाकिस्तानी न्यायालयाकडून जामीनावर सुटका करण्यात आली. तब्बल सहा वर्षांच्या बंदिवासानंतर रावळपिंडी येथील अदिआला कारागृहातून लख्वी बाहेर पडला. यावेळी लख्वीच्या स्वागतासाठी जमात-उल-दवा संघटनेचे अनेक समर्थक कारागृहाबाहेर हजर होते.
लाहोर उच्च न्यायालयाने गुरूवारी सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याच्या पंजाब सरकारच्या आदेशाला स्थगिती देऊन लख्वीची सुटका करण्याचे आदेश दिले होते. लख्वीची सुटका करण्याच्या या निर्णयावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भारताला पाकिस्तानशी चर्चा करायची आहे, पण मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधाराला सोडण्याचा हा निर्णय दुर्देवी आणि निराशाजनक असल्याचे राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सरकार लख्वीविरुद्ध काही संवेदनशील अभिलेख सादर करण्यास अपयशी ठरल्यामुळे लाहोर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मोहम्मद अन्वरुल हक यांनी त्याच्या स्थानबद्धतेला स्थगिती दिली. सुटकेसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा जामीन सादर करण्याची अट न्यायालयाने घातली होती. विधी अधिकाऱ्याने लख्वीबाबत महत्त्वाची माहिती सादर केली होती, परंतु न्यायालयाने ती स्वीकारली नाही.
लष्करे तोयबाचा ऑपरेशन कमांडर असलेल्या लख्वीला इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने गेल्या वर्षी १८ डिसेंबरला जामीन मंजूर केला होता. मात्र याबाबत भारताने तीव्र निषेध नोंदवल्यानंतर पाक सरकारने त्याला दुसऱ्याच दिवशी सार्वजनिक सुव्यवस्था कायद्याखाली अटक केली होती.