मुंबईच्या कलिना येथील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सनी पवार या अकरा वर्षीय मुलाने चित्रपट क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. १९व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये त्याने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून पुरस्कार जिंकला आहे. ‘चिप्पा’ या चित्रपटासाठी त्याची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

सनी पवार हा एक गुणी कलाकार असून कलिना येथील कंची कर्वेनगर या झोपडपट्टीत राहतो. त्याने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील १९ व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल २०१९मध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून पुरस्कार जिंकला आहे. ‘चिप्पा’ या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. सनीने यापूर्वी ऑस्ट्रेलिअन दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या २०१६मधील ‘लायन’ या हॉलिवूडपटातही काम केले आहे.

या पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना सनीने म्हटले, पुरस्कार मिळाल्याने मी खूपच खूश आहे. याचे सर्व श्रेय माझ्या पालकांना जाते. मला रजनीकांत यांच्याप्रमाणे मोठा कलाकार व्हायचं आहे. माझ्या पालकांना माझा अभिमान वाटेल अशीच कामगिरी भविष्यातही करायची आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्हींमध्ये काम करायची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे.