मुंबई लोकलच्या पश्चिम मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकावर देशातील पहिल्या ‘पॉड’ हॉटेलची निर्मीती केली जाणार आहे. रेल्वे स्थानकावरील हे पहिले ‘पॉड’ हॉटेल मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर बनविण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे.


लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रवास करून आलेल्या किंवा उपनगरीय रेल्वे प्रवास करण्याऱ्या प्रवाशांना तात्पुरत्या निवासासाठी ‘पॉड’ हॉटेलची निर्मिती करण्यात येणार आहे. अत्याधुनिक, आरामदायी, आलिशान अशा लहान आकाराच्या पॉड खोल्यांची उभारणी करण्यात येणार आहे. आयआरसीटीसीकडून अशा ३० पॉड (खोल्या)ची उभारणी करण्यात येईल. या पॉड हॉटेलमध्ये तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था प्रवासांसाठी उपलब्ध होईल. आयआरसीटीसीकडून या संदर्भात पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला पश्चिम रेल्व प्रशासनाकडून मंजुरी मिळाल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कमी खर्चात आणि कमी जागेत आधुनिक डिझाइनच्या पॉड हॉटेल उभारण्यात येईल. प्रवाशांना येथे राहण्याची उत्तम सोय होणार आहे. पॉड हॉटेलची संकल्पना सर्वप्रथम जपान देशात मांडण्यात आली. जपानने येथील प्रवाशांना, कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी, विश्रांतीसाठी जागा मिळावी, यासाठी पॉडची निर्मिती केली.

यामध्ये वाय-फाय, यूएसबी पोर्ट, टीव्ही, वातानुकूलित रूम, विश्रांतीसाठी आरामदायी व्यवस्था विद्युत दिवे (याचा प्रकाश कमी-जास्त करण्याची व्यवस्था) असतील. हवेशीर जागा, सरकते दरवाजे, स्मोक डिटेक्टर अशा विशेष सुविधांचा लाभ प्रवाशांना घेता येईल.
मुंबई सेंट्रल स्थानकावर उभारण्यात येणाऱ्या पॉडची सुविधा यशस्वी ठरल्यास, इतर ठिकाणीही अशी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विचार केला जाणार आहे.