कतारमध्ये तुरूंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या मुंबईतील एका जोडप्याला सोडवण्यासाठी एनसीबीकडून प्रयत्न सुरू आहेत. हे जोडप मुंबईतील असून, त्यांना कतारमधील न्यायालयानं ड्रग्ज प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कतारमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या या जोडप्याच्या बॅगेत ४ किलो हशीश सापडलं होतं. त्यानंतर न्यायालयानं त्यांना तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, ड्रग्ज प्रकरणाचं रॅकेट असून, त्यात या जोडप्याला फसवण्यात आल्याचं चौकशीतून समोर आलं आहे.

मोहम्मद शारिक आणि ओनिबा कौसर शकील अहमद हे जोडप २०१९ मध्ये कतारला हनिमूनसाठी गेलं होतं. कतारच्या विमानतळावर दाखल झाल्यानंतर तपासणीमध्ये त्यांच्या बॅगेत ४.१ किलो हशीश नावाचं ड्रग्ज सापडलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. कतारमधील सत्र न्यायालयात त्यांच्याविरुद्ध जलगती खटला चालवण्यात आला. न्यायालयानं त्यांना दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच ६ लाख रियाध (कतारचं चलन) इतका दंडही ठोठावला होता.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ओनिबा कौसर यांच्या वडिलांनी कतारमधील भारतीय दूतावासाला पत्र व्यवहार केला. आपली मुलगी व जावई निर्दोष असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर २७ सप्टेंबर २०१९ रोजी शकील अहमद कुरेशी यांनी एनसीबीचे (अमली पदार्थ विभाग) महासंचालक राकेश अस्थाना यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी जावयाची मावशी तबस्सूम, रियाज कुरेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी मुलगी व जावयाच्या बॅगेत ड्रग्ज टाकल्याचं म्हटलं होतं.

जोडप कतारकडे निघालेलं असतानाच तबस्सूम यांनी शारिक यांना एक बॅग दिली. ही बॅग त्यांच्या बॅगेत ठेवण्यास सांगितली. त्यानंतर ५ जुलै २०१९ रोजी हे जोडपं बंगळुरूवरून कतारला रवाना झालं. बंगळुरूमध्ये तबस्सूम यांनी त्यांना आणखी एक बॅग दिली. शारिक यांना संशयास्पद वाटल्यानं त्यांनी तबस्सूम यांना फोन करून चौकशी केली. त्यावर त्या बॅगेत गुटखा आणि जर्दा असून, हे कतारमध्ये खूप महाग असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी संपर्क दिलेल्या व्यक्तीला ही बॅग देण्यास त्यांनी सांगितलं. त्यानंतर कतारमध्ये जोडप्याला अटक झाली.

ही संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर एनसीबीनं शकील अहमद कुरेशी यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सुरू केली. या घटनेचा तपास करत असताना हे रॅकेट असल्याचं दिसून आलं. हे रॅकेट निझाम कारा, तबस्सूम आणि इतर काही जण चालवत असल्याचं चौकशीत समोर आलं. त्यामुळे एनसीबीनं आता दूतावासामार्फत कतारमधील प्रशासनाशी संपर्क केला असून, जोडप निर्दोष असून, रॅकेटनं त्यांना फसवल्याचं म्हटलं आहे.