भारतातील बँकांना ९ हजार कोटी रूपयांचा चुना लावून परदेशात फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याभोवतीचा कायद्याचा आणखी फास आवळला गेला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विजय मल्ल्याविरोधात मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

देशातील अनेक बँकांचे जवळपास नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवणारा मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या अडचणी वाढल्या आहेत. एका बँकेचे ९०० कोटी रुपये थकवल्याप्रकरणी विजय मल्ल्याविरोधात ईडीने बुधवारी आरोपपत्र दाखल केले. २००९ मध्ये किंगफिशर एअरलाईन्सला बँकेने ९०० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. एअरलाईन्स तोट्यात असताना हे कर्ज देण्यात आले होते.

ईडीच्या तपासणीत बँकेतील माजी अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. नियम शिथील करुन कर्ज दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र या अधिकाऱ्यांविरोधात ईडीला कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. किंगफिशर आणि बँकेच्या अधिकाऱ्यांमधील आर्थिक हितसंबंध उघड झालेले नाही असे सूत्रांकडून समजते. ईडीने आरोपपत्रात विजय मल्ल्याला मुख्य आरोपी म्हटल्याची शक्यता असून ९०० पैकी ६०० कोटी परदेशात गुंतवण्यात आले. तर ३०० कोटी भारतात गुंतवल्याचे समोर आले होते.
दरम्यान, मंगळवारी ब्रिटनच्या न्यायालयाने ४ डिसेंबरपर्यंत मल्ल्याला जामीन मंजूर केला आहे. सुनावणीसाठी आलेल्या विजय मल्ल्याने न्यायालयाबाहेर निर्दोषत्व सिद्ध करण्याइतका भक्कम पुरावा असल्याच्या वल्गनाही केल्या. वेस्टमिन्स्टर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली होती.