चौपदरीकरणाचे रखडलेले काम २०१९पर्यंतही अशक्यच; वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती 

गेल्या तीन वर्षांत साडेतीन हजार अपघात आणि सुमारे आठशे बळी जाऊनही मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम २०१९पर्यंतही पूर्ण होण्याची शक्यता नाही. ४७५ किलोमीटरपैकी तब्बल २८० किलोमीटरचे काम अजूनही भूसंपादनाच्या जंजाळात अडकल्याने दुपदरी मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार आहे.

महाडजवळ पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर चौपदरीकरणाचे अनेक वर्षे रखडलेले काम पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे. त्यातही पनवेल ते इंदापूर हा ८४ किलोमीटरचा टप्पा सर्वाधिक क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवूनही प्रामुख्याने भूसंपादनाच्या किचकट प्रश्नांमुळे या महामार्गाचे काम वेगाने सरकत नसल्याचे चित्र आहे.

‘पनवेल ते इंदापूर टप्प्याचे काम मागील सरकारने दिले होते. आता तो कंत्राटदार काम करण्यास तयार नाही. त्याला बडतर्फ करावे, तर न्यायालयीन विलंबाची भीती आहे. त्यातच बँकांनी या प्रकल्पांसाठी सातशे ते आठशे कोटी रुपयांची कर्जे दिली आहेत. ती थकीत होण्याची भीती आहे. त्यामुळे आम्ही मध्यममार्ग काढतो आहे. त्यासाठी बँकांनी संमती दाखविली आहे. तरीदेखील हा विलंब रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या सरस व सर्वोत्तम कामगिरीवर एक कलंकच आहे,’ अशी टिप्पणी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केली.

भूसंपादनासाठीचे सुमारे चार हजार कोटी रुपये गृहीत धरले तर चौपदरीकरणाच्या प्रकल्पाची किंमत सुमारे दहा हजार कोटी रुपयांपर्यंत पोचते. २०१० पासून हे काम चालू आहे. आतापर्यंत ४८५ किमीपैकी झाराप ते पत्रादेवी हा २३ किमीचा सर्वात शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे. खावटी ते वाकेडदरम्यानच्या १७०.६ किमी कामाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होईल. पण तरीही सुमारे २७९ किमी टप्प्यातील काम भूसंपादनाच्या पातळीवर रखडले आहे. ‘नव्वद टक्के भूसंपादन झाल्याशिवाय कामास प्रारंभ न करण्याच्या केंद्राच्या नियमावलीने बरीच कामे सुरू होऊ  शकली नाहीत,’ असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

नव्या पुलाची तयारी सुरू होती..

कोसळलेला पूल तोडून तिथे नवा दोनपदरी पूल बांधण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतानाच ही दुर्घटना घडली आहे. नवा पूल बांधण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला असून भूसंपादन केले जात होते. एकदाचे ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतर निविदा काढण्याचे प्रस्तावित होते. त्यासाठी स्वत:हूनच पूल पाडला जाणार होता, पण तत्पूर्वीच ही दुर्घटना घडली.

सद्य:स्थिती अशी..

  • ’ पनवेल ते खावटी व्हाया इंदापूर (१६१.६ किमी) : ‘डीपीआर’ व भूसंपादन चालू
  • ’ खावटी ते वाकेड (१७०.६ किमी) : सर्व प्रक्रिया पूर्ण. प्रत्यक्ष कामास प्रारंभ
  • ’ वातुळ ते झाराप (११७.९७ किमी) : ‘डीपीआर’ व भूसंपादन चालू
  • ’ झाराप ते पत्रादेवी (२३ किमी) : चौपदरीकरण पूर्ण