आपल्याला दगातील श्रीमंत व्यक्ती किंवा देश यांच्याबाबत माहित असते. पण जगातील श्रीमंत शहरे कोणती याबाबत आपल्याला पुरेशी माहीती नसते. नुकत्याच ‘न्यू वर्ल्ड हेल्थ’तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. यातील आनंदाची बाब म्हणजे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा यामध्ये समावेश आहे. मुंबई जगात १२ व्या क्रमांकावरील श्रीमंत शहर असल्याचे या अहवालात समोर आले आहे. यामध्ये एकूण १५ श्रीमंत शहरांची नावे प्रसिद्ध करण्यात आली. तर मुंबईची संपत्ती ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आता या शहराची संपत्ती आहे, ९५० बिलियन डॉलर म्हणजे अंदाजे ६१ लाख १२ हजार ७७५ कोटी रुपये.

या श्रीमंत शहरांच्या यादीत न्यूयॉर्कने पहिला क्रमांक पटकावला असून या शहराची संपत्ती ३ ट्रिलियन डॉलर म्हणजे अंदाजे १९३ लाख कोटी रुपये आहे. तर दुसऱ्या स्थानावर लंडनने आणि तिसऱ्या स्थानावर जपानने बाजी मारली आहे. याशिवाय यामध्ये कॅलिफोर्नियातील शहरे, चीन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रांस या देशातील शहरांचाही समावेश आहे. आता शहराची संपत्ती म्हणजे त्या-त्या शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक संपत्ती. यामध्ये मालमत्ता, रोकड, इक्विटी यासारख्या गोष्टींची नोंद करण्यात आली आहे. सरकारी निधीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या शहरांची यादी पाहता मुंबई टॉप १० मध्ये आहे. याचे कारण म्हणजे १ बिलियनपेक्षा जास्त संपत्ती असलेले एकूण २८ अब्जाधीश मुंबईत आहेत. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आहे.

जगातील १५ श्रीमंत शहरांची यादी आणि संपत्ती

१. न्यूयॉर्क (अमेरिका) – ३ ट्रिलियन डॉलर
२. लंडन (यूके) – २.७ ट्रिलियन डॉलर
३. टोकियो (जपान) – २.५ ट्रिलियन डॉलर
४. सॅन फ्रान्सिस्को (कॅलिफोर्निया) – २.३ ट्रिलियन डॉलर
५. बीजिंग (चीन) – २.२ ट्रिलियन डॉलर
६. शांघाय (चीन) – २ ट्रिलियन डॉलर
७. लॉस एंजेलस (कॅलिफोर्निया) – १.४ ट्रिलियन डॉलर
८. हाँग काँग – १.३ ट्रिलियन डॉलर
९. सिडनी (ऑस्ट्रेलिया) – १ ट्रिलियन डॉलर
१०. सिंगापूर – १ ट्रिलियन डॉलर
११. शिकागो – ९८८ बिलियन डॉलर
१२. मुंबई (भारत) – ९५० बिलियन डॉलर
१३. टोरंटो (कॅनडा) – ९४४ बिलियन डॉलर
१४. फ्रँकफर्ट (जर्मनी) – ९१२ बिलियन डॉलर
१५. पॅरिस (फ्रान्स) – ८६० बिलियन डॉलर

तर भारतातील १ टक्का श्रीमंताकडे देशातील ७३ टक्के संपत्ती असल्याची माहिती एका अहवालातून नुकतीच समोर आली होती. ६७ कोटी भारतीयांच्या संपत्तीमध्ये फक्त एक टक्क्यांनी वाढ झाल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते. भारतातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी यानिमित्ताने समोर आली आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम या संस्थेचा ‘रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ’ हा तो अहवाल होता. भारतातील ३७ टक्के अब्जाधीशांकडे वारसाहक्काने संपत्ती आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते. देशातील १०१ अब्जाधीशांपैकी ५१ जण हे ६५ वर्षांवरील आहेत. त्यांच्याकडे एकूण १० हजार ५४४ अब्ज रुपये इतकी संपत्ती आहे. अब्जाधीशांच्या संपत्तींमध्ये २०१० पासून वर्षाला सरासरी १३ टक्के या वेगाने भर पडत आहे.