मुंबई, चेन्नई व कोलकाता यांच्यासह समुद्रकिनाऱ्यावरील इतर काही शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण फार मोठे असल्याची माहिती सरकारने राज्यसभेत दिली.
‘अर्थ सायन्स सिस्टीम ऑर्गनायझेशन – इंटिग्रेटेड कोस्टल मरिन एरिया मॅनेजमेंट’ यांच्यावतीने अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या ‘कोस्टल ओशन मॉनिटरिंग अँड प्रेडिक्शन सिस्टीम’ (काँपास) अंतर्गत समुद्राच्या पाण्याचा दर्जा तपासण्यासाठी जे नमुने गोळा करण्यात आले.
त्यातून प्रथम स्तरावरील मुंबई, कोलकाता व चेन्नई आणि दुसऱ्या स्तरावरील मंगलोर, कोची, पुदुच्चेरी आणि विशाखापट्टणम या शहरांच्या किनाऱ्यावर प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले. काही प्रसंगांमध्ये, प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात आल्यामुळे रोगकारक बॅक्टेरिया भरपूर प्रमाणात आढळले, असे भूविज्ञान खात्याचे मंत्री हर्षवर्धन यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
या शहरांव्यतिरिक्त देशातील इतर किनाऱ्यांवर प्रदूषणाचे प्रमाण जास्त नाही. ‘सी वॉटर डाटा’ आणि किनाऱ्यावरील पाण्याचा दर्जा तपासण्याचे काम केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘तटवर्ती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांकडे’ योग्य ती उपाययोजना करण्यासाठी सोपवण्यात आले असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.