रविवारी (दि. ५) रात्री नऊ वाजता घरातील दिवे बंद करून ९ मिनिटे पणत्या, दिवे, मेणबत्ती, टॉर्च, मोबाइलचे फ्लॅश लावावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला सर्वसामान्यांपासून कलाकार, नेते आणि उदयोगपती यांनी प्रतिसाद दिला आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे मुकेश अंबांनी आणि त्यांची पत्नी निता अंबानी यांनाही मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिवे लावले. त्यापूर्वी त्यांचे निवास्थान असलेली ‘अँटिलिया’ इमारतीच्या लाइट्सही बंद करुन पणत्यांची रोषणाई करण्यात आली होती. करोना व्हायरसच्या लढ्यात अंबानी कुटुंबीयही सहभागी झाले आहेत.

मोदी यांनी रविवारी केलेल्या आवाहनाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. करोनाचा अंधार दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील नागरिकांनी रविवारी रात्री नऊ वाजता दिवे पेटवले. यामध्ये अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्यापर्यंत सर्वांनी आपला सहभाग नोंदवला. अगदी देशातील सैनिकांपासून ते उद्योगपती रतन टाटांपर्यंत आणि कोच्चीमधील चर्चपासून आणि मुंबईतील दादर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरापर्यंत अनेकांनी दिवे लावून एकतेचा संदेश दिला.

दरम्यान, राज्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने मदतीसाठी पुढाकार घेत मुंबईत विशेष रुग्णालय सुरू केलं आहे. अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र १०० बेड्सची सुविधा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ कोटी
करोनाशी लढा देण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आर्थिक मदत देण्यात आली असून मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्सने महाराष्टाच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटी रुपयांची देणगी दिली आहे. रिलायन्स फाऊंडेशनमार्फत विविध शहरांमध्ये गरजूंना मोफत जेवण पुरवले जाणार आहे. तसंच करोना रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व आपत्कालीन सेवा वाहनांसाठी मोफत इंधन उपलब्ध करून दिले जाणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने दिवसाला एक लाख मास्क तयार करण्यापर्यंतची क्षमता वाढविली आहे. समूहाच्या विविध कंपन्या, विभागात कार्यरत असलेले कंत्राटी तसेच तात्पुरते कर्मचाऱ्यांना नियमित वेतन दिले जाईल, असे रिलायन्सने स्पष्ट केले आहे.

PM फंडात  ५०० कोटी रुपयांची मदत

आपातकालीन परिस्थितीसाठी असलेल्या पंतप्रधान नागरीक सहाय्यता निधीला म्हणजे पीएम केअर्स फंडाला रिलायन्स इंडस्ट्रीजने ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.