25 April 2019

News Flash

शिक्षिका डी-मॅट अकाऊंट उघडायला गेली, दीड लाख गमावून बसली

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी डी मॅट अकाऊंट ओपन करतानाच शिक्षिकेला दीड लाख रुपये गमवावे लागले. शीतल केतन ठक्कर असे या शिक्षिकेचे नाव आहे.

संग्रहित छायाचित्र

शेअर्समध्ये पैसे गुंतवून पैसे कमवण्याचा मार्ग अनेकांना आवडतो. मुंबईतल्या शिक्षिकेलाही हा मोह आवरला नाही. मात्र शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी डी मॅट अकाऊंट ओपन करतानाच या शिक्षिकेला दीड लाख रुपये गमावण्याची वेळ आली आहे. शीतल केतन ठक्कर असे या शिक्षिकेचे नाव आहे. डी मॅट अकाऊंट उघडतानाच या शिक्षिकेला डेबिट आणि क्रेडिट कार्डचे तपशील दिल्याने १ लाख ५६ हजार गमवावे लागले आहेत.

शीतल केतन ठक्कर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी डी मॅट अकाऊंट उघडायचे होते. त्यांनी इंटरनेटवर राष्ट्रीयकृत बँकांच्या वेबसाइट्स पाहिल्या. त्यामधील एका राष्ट्रीयकृत बँकेचा कस्टमर केअर क्रमांक त्यांना मिळाला. त्यावर फोन केला असता त्यांना त्यांच्या डेबिट कार्डचा १६ अंकी क्रमांक सांगण्याची विनंती करण्यात आली. तसेच तीन अंकी सीसीव्ही क्रमांकही सांगण्याची विनंती करण्यात आली. यानंतर शीतल यांच्या मोबाइलवर ओटीपी अर्थात वन टाइम पासवर्ड आला तोही फोनवरील इसमाने त्यांना सांगण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधून पैसे डेबिट झाले. त्यांनी फोनवरील कस्टमर केअर एक्झ्युकिटिव्हने विचारणा केली. तेव्हा तुम्हाला फोनवर एक पिन येईल आणि तुमचे पैसे पुन्हा जमा होतील असे त्याने सांगितले.

एवढेच नाही तर फ्रॉड करणाऱ्या माणसाने शीतल यांना तुमच्याकडे आणखी काही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आहेत याची विचारणा केली. ज्यानंतर शीतल यांनी आपल्याकडे आणखी दोन क्रेडिट कार्ड असल्याचे सांगितले. फ्रॉडरने या कार्डचे डिटेल्स विचारले तसेच सीसीव्ही आणि ओटीपीही विचारले. आपण त्याला सातत्याने पैसे डेबिट होत असल्याचे सांगत होतो तरीही त्याने आपल्याला पैसे परत येतील काळजी करू नका असे सांगितले. पाच दिवस उलटूनही पैसे परत न आल्याने शीतल ठक्कर यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

पाच दिवसांनी शीतल ठक्कर बँकेत गेल्या तेव्हा बँकेने आमचा कोणताही कस्टमर क्रमांक आणि अशा प्रकारची वेबसाइट नसल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवसापासून शीतल ठक्कर त्या क्रमांकावर फोन करत होत्या पण तो बंदच लागत होता. काही फ्रॉडर्सनी आमच्या नावे बनावट वेबसाइट तयार केली असावी असे बँकेने म्हटले आहे. या संदर्भात कलम ४१९ आणि कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

First Published on April 16, 2018 6:54 pm

Web Title: mumbai teacher trying to open demat account loses rs1 57 lacs