मुंबईवर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड झाकिउर रहमान लख्वी याला अटक करण्यास इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीविरोधात गुरुवारी अपाकिस्तानी सरकारने तेथील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हिवाळी सुटीनंतर न्यायालयाचे कामकाज ८ जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यानंतर त्यावर कार्यवाही होईल.
‘‘मुंबईवरील हल्ल्यांच्या संशयिताला अटक करण्यास इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला आज गृह खात्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले,’’ असे पाकिस्तानी गृह खात्याच्या प्रवक्त्याने पीटीआयला सांगितले. प्रवक्ता असेही म्हणाला की, लख्वीच्या सुटके ने देशात कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याकडे इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला कायदेशीर आधार नाही.
लख्वीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी पीटीआयला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस मिळाल्यानंतर ते इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करतील. सरकारचा दावा फारसा सबळ नाही. एक दशलक्ष रुपयांचा जातमुचलका भरणे आणि मुंबई हल्ल्यांसंबंधी तेथे सुरू असलेल्या खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला हजर राहणे या अटींवर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने लख्वीला तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले होते.

‘लख्वीच्या जामिनाबाबत अवास्तव आकांडतांडव’
मुंबईवर २००८ साली झालेल्या हल्ल्यांसंबंधीच्या खटल्यात पाकिस्तानात अटकेत असलेला प्रमुख संशयित झाकीऊर रहमान लख्वी याच्या जामीन अर्जासंबंधात भारताने आणि प्रसारमाध्यमांनी अवास्तव आकांडतांडव केला आहे, असा दावा पाकिस्तानने गुरुवारी केला. पाकिस्तानी परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या तस्नीम अस्लम यांनी म्हटले की, हे प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. न्यायालयीन प्रक्रिया योग्य मार्गाने सुरू आहे. असा वेळी प्रसारमाध्यमांनी मतप्रदर्शन करणे किंवा निर्णय देणे उचित ठरणार नाही.