पाकिस्तानचा पुन्हा एकदा कांगावा

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याची सुनावणी लवकर पूर्ण करण्यासाठी अधिक पुरावे देण्याची सूचना भारताला करण्यात आली असल्याचे पाकिस्तानने गुरुवारी स्पष्ट केले. या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाचा कमांडर झकीर-ऊर-रेहमान लख्वी आणि अन्य सहा जणांविरुद्ध खटला सुरू आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी भारताच्या परराष्ट्र सचिवांना पत्र लिहून अधिक पुरावे देण्याची मागणी केली आहे, अधिक पुरावे दिल्यास खटल्याचे कामकाज लवकर पूर्ण करता येईल, असे सांगण्यात आले आहे. भारताकडून अद्याप उत्तर आलेले नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

तथापि, पाकिस्तानने हे पत्र भारताला कधी पाठविले त्याबाबत नफीस यांनी सविस्तर तपशील दिला नाही. पाकिस्तानने या हल्ल्याप्रकरणी लख्वी याच्यासह लष्कर-ए-तोयबाच्या सात जणांना अटक केली आहे.

लख्वी याच्यासह अब्दुल वाजिद, मझहर इक्बाल, हमाद सादिक, शाहीद रियाज, जमील अहमद आणि युनुस अंजूम यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि मुंबईवरील हल्ल्याचा कट रचून तो घडवून आणणे आदी आरोप ठेवले आहेत. लख्वी याला एक वर्षांपूर्वी जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर तो सध्या अज्ञात स्थळी वास्तव्य करीत आहे. तर अन्य सहा जण रावळिपडीतील आदिआला कारागृहात आहेत. पाकिस्तानात हा खटला जवळपास सहा वर्षे सुरू आहे. खटल्याची सुनावणी लवकर पूर्ण करावी, अशी मागणी भारत सातत्याने करीत आहे.