मुंबईतील एका महिलेने आपल्या पॉर्न अॅडिक्ट नवऱ्याविरोधात चक्क सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. माझा नवरा पॉर्न फिल्म पाहतो. त्या पाहण्याची सवयच त्याला लागली आहे. त्यामुळे आमचे नवरा-बायकोचे नाते संकटात सापडले आहे असे या महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नाही शक्य तितक्या लवकर पॉर्न साईट बंद करा असे आवाहनच या महिलेने सुप्रीम कोर्टाला केले आहे. आमचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आले आहे. पॉर्न साईट बंद केल्या तर रुळावर येईल अशी अपेक्षा या महिलेने व्यक्त केली आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार या महिलेने आपल्या तक्रारीत असे म्हटले आहे की तिचा नवरा पॉर्न साईट बघण्याच्या नादात दैनंदिन कामेही करत नाही. एवढेच काय तर त्याने त्याच्या अनेक शारिरीक गरजांकडेही दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे. माझ्यावर तो आता घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकतो आहे त्यामुळे शक्य असेल तेवढ्या लवकर या पॉर्न वेबसाईट्स बंद करा जेणेकरून माझे आयुष्य वाचेल असे या महिलेने म्हटले आहे.

या महिलेने फॅमिली कोर्टातही एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ज्यामध्ये तिचा पती तिच्याशी शारिरीक संबंधही ठेवू इच्छित नाही तसेच अनैसर्गिक संबंध ठेवण्यास तो आपल्याला भाग पाडतो असेही म्हटले आहे. या सगळ्या प्रकारामुळे माझे वैवाहिक आयुष्य संपुष्टात येते आहे. लग्नाच्या आधीपासूनच नवऱ्याला पॉर्न पाहण्याची सवय लागली असल्याचेही या प्रतिज्ञापत्रात महिलेने स्पष्ट केले आहे. पॉर्न पाहणे हे आता मोबाईल आणि इंटरनेटमुळे अगदी सहज शक्य आहे. त्यामुळे देशाची तरूण पिढीही अधोगतीकडे चालली आहे. आपला अमूल्य वेळ अनेक तरूण पॉर्न बघण्यात घालवतात. त्यामुळेही या वेबसाईट बंद कराव्यात तसे न केल्यास महिलांचे लैंगिक शोषण, बलात्कार, विनयभंग असे गुन्हे वाढीला लागतील असेही या महिलेने म्हटले आहे.

मागील वर्षी १२ वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानेही अशाच प्रकारे पॉर्न साईट बंद करण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. माझे मित्र कायम पॉर्न बघत असतात त्यामुळे यावर बंदी आणावी असे या विद्यार्थ्याने म्हटले होते. सुप्रीम कोर्टाने पॉर्न वेबसाईट्सबाबत सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. चाईल्ड पॉर्नवर बंदी आणण्यात आली आहे मात्र पॉर्न साईट्सवर बंदी आणली गेलेली नाही. अशात ही अजब तक्रार घेऊन महिला सुप्रीम कोर्टात पोहचली आहे.