दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना सोमवारी रात्री मुंगेरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला तो अद्यापही शांत झालेला नसून गुरुवारी निदर्शकांनी शहरातील अनेक पोलीस ठाण्यांना आणि चौक्यांना आगी लावल्या त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची नासधूस केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने मुंगेर जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची उचलबांगडी केली आहे.

सोमवारी दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना गोळीबार आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आणि त्यामध्ये एक जण ठार झाला तर अनेक जण जखमी झाले त्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. मगधच्या विभागीय आयुक्तांना एका आठवडय़ात चौकशी पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षिकांची बदली

मुंगेरचे जिल्हा दंडाधिकारी राजेश मीना यांची सर्वसामान्य प्रशासन विभागात बदली करण्यात आली आहे तर पोलीस अधीक्षिका लिपी सिंह यांना राज्य पोलीस मुख्यालयात पाठविण्यात आले आहे. त्यानंतर बिहार सरकारने निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून रचना पाटील यांची जिल्हा दंडाधिकारी म्हणून तर मानवजीतसिंह धिल्लन यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

सोमवारी रात्री घडलेल्या घटनांचे हिंसक पडसाद गुरुवारीही उमटले, निदर्शकांनी मुफ्फसील आणि शहरातील महिला पोलीस ठाण्यांना आगी लावल्या त्याचप्रमाणे पूरबसराई आणि वासुदेवपूर येथील पोलीस चौक्याही पेटविण्यात आल्या, त्यानंतर निदर्शकांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाची आणि अन्य अनेक पोलीस ठाण्यांची आणि चौक्यांची नासधूस केली. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासही लक्ष्य करण्यात आले.