दिल्लीतील मुनिरका येथे झालेल्या बीएमडब्ल्यू आणि उबेर कॅबच्या अपघातात कॅब चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर बीमडब्ल्यूच्या चालकाने पळ काढला. त्याला पोलिसांनी १४ तासानंतर अटक केली आहे. शोएब कोहली असे या २४ वर्षीय कार चालकाचे नाव आहे. ही कार त्याच्या आईच्या नावावर असून तो एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करतो अशी माहिती पोलिसांनी दिली.

कोहली हा वसंत विहारकडे जात असताना मुनिरका येथे त्याची बीएमडब्ल्यू उबेर कॅबवर धडकली. ही टक्कर इतकी जोरात होती की कॅब चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही टक्कर झाल्यानंतर कॅब चालकाची व्हॅगन आर किमान पन्नास मीटर घसरत गेल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हा अपघात झाल्यानंतर आम्हाला एखाद्या स्फोट झाल्यासारखा आवाज आल्याचे त्या परिसरातील लोकांनी सांगितले. कार घटनास्थळी ठेवून कोहलीने तेथून पळ काढला.

त्याला आम्ही अटक केली आहे असे पोलिसांनी सांगितले. कोहलीवर निष्काळजीपणे गाडी चालवण्याचा गुन्हा, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. उबेर चालकाचे नाव नझरुल इस्लाम असे होते. तो पश्चिम बंगालचा रहिवासी होता.