हिंदी, उर्दू साहित्यिकांच्या यादीत अणि साहित्य क्षेत्रातील काही उल्लेखनीय लेखकांच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या मुन्शी प्रेमचंद यांची आज १३६वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त फक्त साहित्य क्षेत्रातूनच नव्हे तर गुगलकडूनही त्यांना आज श्रद्धांजली वाहिली जात आहे. गुगलने मुन्शी प्रेमचंद यांना भावलेल्या ग्रामीण भारताचे चित्रण करणारे डुडल त्यांच्या जयंतीनिमित्त बनवले आहे.
गोदान (१९३६) या मुन्शी प्रेमचंद यांच्या आजतागायत चर्चेत असणाऱ्या कादंबरीपासून प्रेरित होत आजचे हे गुगल डुडल सजले आहे. ३१ जुलै १८८० रोजी उत्तर प्रदेशात जन्मलेल्या मुन्शी प्रेमचंद यांचे धनपत राय हे खरे नाव आहे. साहित्य आणि कादंबरी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुन्शी प्रेमचंद यांना ‘उपन्यास सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते. प्रेमचंद यांचे साहित्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरले आहे. साहित्य क्षेत्रातील प्रेमचंद यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. एक संवेदनशील लेखक, सुजाण नागरिक आणि एक कुशल वक्ता अशी ओळख असणाऱ्या मुन्शी प्रेमचंद यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण ३०० लघुकथा, कादंबऱ्या आणि अनमोल अशा साहित्याचा खजिना दिला आहे. संप्रदाय, भ्रष्टाचार, जमिनदारी, गरिबी अशा विषयांवर भाष्य करत मुन्शी प्रेमचंद यांनी आपले साहित्य रचले होते. अतिशय सोप्या – सरळ भाषेत लिखाण करणाऱ्या प्रेमचंद यांचे साहित्य नवोदित लेखकांसाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत ठरले आहे.