इराकची संसद नव्या मंत्रिमंडळाला मान्यता देण्यास अपयशी ठरल्यामुळे राजधानी बगदादमध्ये हजारो निदर्शकांनी शनिवारी कडक सुरक्षाव्यवस्था असलेल्या ‘ग्रीन झोन’मध्ये शिरून धुमाकूळ घातला. काही जणांनी तर संसदेच्या इमारतीत लुटालूट सुरू केली.
हजारो संतप्त निदर्शकांनी देशातील महत्त्वाच्या सरकारी संस्था असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात शिरकाव केला आणि काही जणांनी संसदेच्या इमारतीत लुटालूट सुरू केली़ दंगेखोर इमारतीच्या अनेक भागांमध्ये धुमाकूळ घालत असताना इतर निदर्शक ‘शांत राहा’ असे ओरडत ही नासधूस थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. पक्षाशी संलग्न असलेल्या विद्यमान मंत्र्यांचे सरकार बदलून त्यांच्या जागी नवे मंत्री नेमण्यास मान्यता देण्यात, तसेच त्यासाठी गणपूर्ती करण्यात संसद पुन्हा एकदा अपयशी ठरल्यामुळे ‘ग्रीन झोन’च्या बाहेर सुरू असलेली निदर्शने तीव्र झाली.