उत्तर प्रदेशच्या बदाऊँ जिल्ह्य़ात एक पुजारी व त्याच्या दोन सहकाऱ्यांनी ५० वर्षीय अंगणवाडी सेविकेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केली. या घटनेची दिल्लीतील २०१२ सालच्या निर्भया प्रकरणाशी तुलना करून विरोधी पक्षांनी याबाबत जोरदार आवाज उठवला आहे.

संबंधित पुजारी फरार असला, तरी शवचिकित्सा अहवालात बलात्कारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याच्या दोन सहकाऱ्यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. या महिलेचा एक पाय व बरगडीचे हाड मोडलेले होते व तिच्या गुप्तांगात जखमा आढळल्या.

रविवारी ही घटना घडल्यानंतर त्याच रात्री पुजारी व त्याच्या सहकाऱ्यांनी मृतदेह पीडित महिलेच्या घरी नेला आणि तो मंदिर परिसरातील एका कोरडय़ा विहिरीत आढळल्याचे सांगितले, तेव्हा ही घटना उघडकीला आली. बलात्कार झाल्याचे शवविच्छेदनात निश्चित झाल्यानंतर दोन दिवसांनी गुन्हा नोंदवण्यात आला व पुजाऱ्याच्या २ सहकाऱ्यांना पकडण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी ‘शक्य तितकी कठोर कारवाई’ करण्याचा आदेश पोलिसांना दिला. मात्र, या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. विरोधी पक्षांनी या घटनेचे वर्णन ‘भयानक’ व ‘लज्जास्पद’ असे करून सरकावर जोरदार हल्ला चढवला, तर काँग्रेसने तिचे वर्णन २०१२ सालच्या निर्भया प्रकरणाशी केले.

राष्ट्रीय महिला आयोगानेही या घटनेची नोंद घेतली असून, या प्रकरणाच्या तपासाकरता आपल्या सदस्यांचे पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘उत्तरीय तपासणीत बलात्कारावर शिक्कामोर्तब झाले असून, पीडित महिलेच्या गुप्तांगावर जखमा आहेत. तिच्या पायात फ्रॅक्चर आहे व बरगडीचे हाडही मोडले आहे’, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल उघैती पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला निलंबित करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

विरोधकांकडून टीका

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यनाथ सरकारला लक्ष्य करीत उत्तर प्रदेश प्रशासनाचे हेतूच शुद्ध नसल्याचे म्हटले आहे. गांधी यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे, की हाथरसमध्ये सरकारने पीडित महिलेच्या वतीने उठवण्यात आलेला आवाज ऐकला नाही. सरकारने अधिकाऱ्यांना वाचवून पीडितेचा आवाज दडपून टाकला आता बुदाऊन येथे पोलीस अधिकारी कुणाचे ऐकून घ्यायला तयार नाहीत. त्यांनी त्या घटनास्थळी जाण्याचीही तसदी घेतली नाही.

– काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही घटना भयानक व मानवतेला काळिमा फासणारी असल्याचे सांगून आणखी किती निर्भया हैवानांना बळी पडणार आहेत, आदित्यनाथ सरकार केव्हा जागे होणार, असे सवाल केले आहेत.

– समाजवादी पक्षानेही या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार खोटे दावे करीत असून या प्रकरणातील दोषींना पकडून शिक्षा करावी, असे म्हटले आहे.