उत्तर प्रदेशात एका आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांपैकी आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले. कानपूरमध्ये झालेली ही घटना देशाभरातील लोकांच्या चर्चेचा विषय ठरली. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशच्या कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शहीद झालेले पोलीस ज्या आरोपीला अटक करण्यासाठी गेले होते, तो आरोपी म्हणजे विकास दुबे! त्यामुळे प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडला, आठ पोलिसांच्या हत्येला कारणीभूत ठरलेला विकास दुबे आहे, तरी कोण?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकीय नेत्यांसोबत उठबस असलेल्या विकास दुबेविषयी ‘बीबीसी हिंदी’नं खास रिपोर्ट तयार केला आहे. आठ पोलिसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विकास दुबेवर चौबेपूर पोलीस ठाण्यात ६० गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या गुन्ह्यांमध्ये खून व खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. अशाच एका खून प्रकरणात पोलीस विकास दुबेला अटक करायला गेले होते आणि त्यानंतर ही घटना घडली.

राजनाथ सिहं यांचं सरकार असताना केली होती मंत्र्याची हत्या

चौबेपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात झालेल्या तक्रारींवरून असं दिसत की, विकास दुबे आणि गुन्हेगारी जगत याचा संबंध ३० वर्षांपूर्वीपासूनचा आहे. यातील वेगवेगळ्या प्रकरणात विकास दुबेला अटकही झाली. पण, एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नाही. विकास दुबेविषयी बोलताना कानपूरमधील पत्रकार प्रवीण मोहता म्हणाले,”२००१ साली विकास दुबे याच्यावर पोलीस ठाण्यात घुसून भाजपाचे राज्यमंत्री संतोष शुक्ला यांची हत्या केल्याचा आरोप लावण्यात आला होता. संतोष शुक्ला यांची हत्या हायप्रोफाईल प्रकरण होतं. पण एकाही पोलिसानं विकास दुबेविरुद्ध साक्ष दिली नाही. पुढे न्यायालयात कोणतेच पुरावे सादर न झाल्यानं विकास दुबेची सुटका झाली,” असं ते म्हणाले.

नंतर २००० साली कानपूरच्या शिवली ठाणे हद्दीत येणाऱ्या ताराचंद इंटर कॉलेजचे सहव्यवस्थापक सिद्धेश्वर पांडेय यांची हत्या झाली. त्या प्रकरणातही विकास दुबेच नवा नोंदवण्यात आलं होतं. पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार २००० सालीच विकास दुबे याच्यावर रामबाबू यादव यांच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. पुढे २००४ मध्ये एका केबल व्यावसायिकाच्या हत्येमध्येही विकास दुबेच नाव आलं होतं. यातील अनेक प्रकरणांमध्ये विकास दुबेला अटक झाली. पण, प्रत्येकवेळी तो जामिनावर सुटला. २०१३ मध्येही एका खून प्रकरणात विकास दुबेच नाव आलं. तसेच २०१८मध्ये चुलत भाऊ अनुराग यांच्यावर जिवघेणा हल्ला केल्याचा आरोप दुबेवर ठेवण्यात आला होता. यासंदर्भात अनुरागच्या पत्नीनं विकास दुबेसह चार लोकांविरोधात तक्रार दिली होती. “प्रत्येक राजकीय पक्षात विकास दुबेच वजन आहे. त्यामुळेच त्याला आतापर्यंत अटक होऊ शकलेली नाही. अटक झाली तरी तो काही दिवसांमध्ये बाहेर आला आहे,” असं पत्रकार प्रवीण मोहता यांनी दुबेविषयी बोलताना सांगितलं.

बिकरू मूळ गाव…

कानपूरजवळ असलेल्या शिवली पोलीस ठाणे हद्दीत येणारं बिकरू हे विकास दुबे याचं मूळ गाव आहे. गावातील विकास दुबे घर किल्ल्यासारखंच आहे, पण त्याच्या परवानगीशिवाय कुणीलाही आत जाता येत नाही, असं त्याच्या गावातील लोक सांगतात. २०२० साली जेव्हा उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची सत्ता होती, त्यावेळी विकास दुबेचा बराच दबदबा होता. त्या काळात विकास दुबेनं गुन्हेगारी जगतात जम बसवत चांगलाच पैसा कमावला,” असं गावातील नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.

विकास दुबेविरुद्ध चौबेपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली सर्व प्रकरण जमीन गैरव्यवहाराशी संबंधित आहेत. या जमिनीच्या व्यवहारातूनच विकास दुबे यानं कोट्यवधी रुपये कमावले. विठूरमध्येच त्याची शाळा, महाविद्यालयेही आहेत. गावातच नाही, तर आजूबाजूच्या गावातही विकास दुबेचा दबदबा होता. जिल्हा पंचायत आणि अनेक गावांमधील सरपंच निवडणुकांमध्ये दुबेच्या आवडीनिवडीला महत्त्व देतात, असं गावातील लोक सांगतात.

“बिकरू गावामध्ये गेल्या १५ वर्षांपासून सरपंचाची बिनविरोध निवड होत आहे. विकास दुबे याच्या कुटुंबातील लोकच गेल्या १५ वर्षांपासून पंचायत निवडणूक जिंकत आहेत,” अशी गावातील एका ज्येष्ठ नागरिकानं दिली. विकास दुबेचे वडील शेतकरी आहेत. ते तिघे भाऊ आहेत. विकास दुबेच्या एका भावाची आठ वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. तिन्ही भावांमध्ये विकास दुबे मोठे आहेत. तर त्याची पत्नी रुचा दुबे जिल्हा पंचायत सदस्य आहेत, असं गावकरी सांगतात.

विकास दुबेविरोधात पोलीस ठाण्यात कितीही तक्रारी दाखल झालेल्या असल्या, तरी गावात त्यांच्याविषयी वाईट बोलणारं कुणीच सापडत नाही. तसेच त्याच्याविरोधात कुणी साक्षही देत नाही. २०००मध्ये शिवलीचे तत्कालीन नगर पंचायत सभापती लल्लन वाजपेयी यांच्याशी वाद झाला. त्यानंतर विकास दुबेनं गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवलं. विकास दुबेला दोन मुलं आहेत. त्यापैकी एक मुलगा लंडनमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेतोय. तर दुसरा कानपूरमध्ये शिकायला आहे, असं गावकरी दुबेविषयी सांगतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of eight up cops who is vikas dube bmh
First published on: 05-07-2020 at 16:21 IST