पश्चिम बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेल्यांमध्ये पती, पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. बंधू प्रकाश पाल हे शाळेत शिक्षक होते. त्यांची पत्नी ब्युटी गर्भवती होत्या. तिघांचाही मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात सापडला अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. या हत्याकांडामुळे शहरात खळबळ माजली आहे.

दरम्यान भाजपा आणि आरएसएसने बंधू पाल आरएसएसचे कार्यकर्ते होते असा दावा केला असल्याने घटनेला राजकीय वळण मिळालं आहे. भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी ट्विट करत या घटनेमुळे आपल्याला खूप मोठा धक्का बसल्याचं सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंब सहा वर्षांपुर्वीच येथे वास्तव्यास आलं होतं. सोमवारी रात्री काही अज्ञातांनी मिळून कुटुंबाची हत्या केली असल्याचं पोलिसांनी सागितलं आहे.

हत्या करण्यासाठी धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. शेजाऱ्यांमुळे ही घटना उघडकीस आली. कुटुंब विजयादशमीला पुजेसाठी न आल्याने शेजारी चौकशी करण्यासाठी गेले असता त्यांना घरात मृतदेह आढळले. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती  दिली.

“बंधू पाल गेल्या २० वर्षांपासून शाळेत शिक्षकाचं काम करत असून मुलाच्या शिक्षणासाठी मुरशीदाबाद येथे शिफ्ट झाले होते,” अशी माहिती त्यांचा भाऊ सुजय घोष याने दिली आहे. त्याचं कोणाशी काही भांडण होतं का यासंबंधी आपल्याला काही माहिती नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. बंधू पाल आरएसएसच्या बैठकीला नेहमी हजर असायचे असं पश्चिम बंगालचे सचिव जिशनू बासू यांनी सांगितलं आहे.