पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील दौलताबाद या ठिकाणी भरब नदीच्या पुलावरून बस नदीत कोसळली. या घटनेत बसमध्ये बसलेल्या ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत ३६ जणांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश आहे. या बसमध्ये एकूण ५६ प्रवासी बसले होते अशी माहितीही समोर येते आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. हा अपघात झाला तेव्हा बसचा चालक मोबाइल फोनवर बोलत होता अशीही माहिती समोर आली आहे.

बस चालवताना मोबाइलवर बोलू नकोस अशी विनंती या ड्रायव्हरला प्रवाशांनी वारंवार केली होती. मात्र त्यांचे न ऐकता तो फोनवर बोलतच होता. अशात समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवण्यासाठी ड्रायव्हरने पुलावर बस वळवण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रयत्नात पुलाचा कठडा तोडून बस नदीत कोसळली आणि ३६ प्रवाशांना त्यांचे प्राण गमवावे लागले.

पहाटे बस निघाली तेव्हा रस्त्यावर धुके होते. त्यानंतर सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास बस पुलावर आली. पूल ओलांडत असतानाच समोरून एक ट्रक आला. मात्र धुक्यामुळे हा ट्रक ड्रायव्हरला दिसला नसावा, कारण आम्हालाही हा ट्रक बसच्या बऱ्यापैकी जवळ आल्यावरच दिसला. त्यानंतर ड्रायव्हरने तातडीने बस वळवण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्यात यशस्वी झाला नाही पुलाचा कठडा मोडून बस नदीत कोसळली अशी माहिती झिरुल हक या प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. ट्रकची धडक बसला बसू नये म्हणून चालकाने उजवीकडे वळण्याचा प्रयत्न केला मात्र बस थेट नदीत कोसळली. यानंतर स्थानिकांनी धावपळ केली आणि प्रवाशांना वाचवण्यास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात सात लोकांना वाचवण्यात यश आले. असेही झिरुल हकने सांगितले.

हा अपघात झाला त्यानंतर ४० मिनिटांनी पोलीस घटनास्थळी पोहचले. सुरुवातीला प्रवाशांना वाचवण्यासाठी कोणतीही तयारी त्यांनी केली नसल्याचे दिसले. त्यानंतर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पोलीस मोठ्या संख्येने घटनास्थळी आले. ज्यानंतर काही संतप्त लोकांचा आणि पोलिसांचा वादही झाला. संतप्त जमावाने दोन सरकारी वाहने पेटवून दिली. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच ही घटना समजताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही घटनास्थळी येऊन गेल्या. काही लोकांचा मृत्यू रूग्णालयात उपचारादरम्यान झाल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. अपघात झालेली बस शिकारपूरहून मालदाच्या दिशेने जात होती. अनेक प्रवासी सकाळची वेळ असल्याने झोपेत होते त्यामुळे सुमारे ३६ लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली.

मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली. तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरु आहे. जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत अशीही माहिती समजली आहे.