आपल्याविरोधात देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आल्यानंतर माजी लष्करप्रमुख अशरफ परवेझ कयानी यांनी आपल्याला मदत केली नाही, या शब्दांत पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी आपली खंत व्यक्त केली. देशद्रोहाचा खटला चालविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने आपल्याला शिक्षा ठोठावली तर आपण दयेसाठी याचना करणार नसल्याचेही मुशर्रफ यांनी स्पष्ट केले. आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला जाईल, असे वाटत नव्हते, असेही मुशर्रफ म्हणाले. एखाद्या लष्करशहास देशद्रोहाच्या खटल्याच्या निमित्ताने अशा प्रकारच्या फौजदारी खटल्यास सामोरे जावे लागण्याची पाकिस्तानच्या इतिहासात पहिलीच घटना घडली आहे.
कयानी हे गेल्याच महिन्यात पदावरून निवृत्त झाले आहेत. कयानी यांना आपणच नियुक्त केले असतानाही त्यांनी आपल्याला देशद्रोहाच्या खटल्यात मदत केली नसल्याचा खेद वाटतो, असे ७० वर्षीय मुशर्रफ यांनी सांगितले. आपल्याला शिक्षा झाली तरीही आपण दयेसाठी विनंती करणार नाही. किंवा भीतीपोटी आपण शिक्षेपासून पळ काढला असे वाटू नये म्हणून अन्य कोणताही पर्याय सुचविणार नसल्याचे मुशर्रफ यांनी ‘एक्स्प्रेस न्यूज’ या वृत्तवाहिनीस मुलाखत देताना स्पष्ट केले.
सन २००७ मध्ये पाकिस्तानात आणीबाणी लागू करण्यात आल्याप्रकरणी मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला असून त्यात ते दोषी ठरले तर त्यांना जन्मठेप किंवा मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते.
आपल्याविरोधात अशा प्रकारचे आरोप ठेवले जातील, असे वाटले नव्हते. आपल्याला कोणताही खेद वा खंत नसून लोकांची इच्छा होती म्हणून तसेच आपल्याविरोधात खटले दाखल करण्यात आले होते म्हणून आपण पाकिस्तानात परतलो, असे मुशर्रफ यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले. पाकिस्तानच्या घटनेतील कलम सहा अन्वये देशद्रोहाचा खटला दाखल केला जातो. मात्र याच कलमाचा वापर आपल्याविरोधात करण्यात येईल, असे आपल्याला वाटत नव्हते, असेही ते म्हणाले.
सन १९९९ मध्ये बंड झाल्यानंतर ‘व्यथित’ झालेले पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपल्याविरोधातील देशद्रोहाच्या खटल्याप्रकरणी रस न दाखविल्याबद्दल मुशर्रफ यांनी ‘आश्चर्य’ व्यक्त केले. बंड झाले तेव्हा मी विमानात होतो आणि ते जमिनीवर होते. आपल्याविरोधातील खटल्यात रस घेतल्यास अनेक गोष्टी उघडकीस येतील अशी त्यांना भीती वाटली असावी, असेही मुशर्रफ म्हणाले.
लोकनियुक्त सरकारचा प्रमुख आणि त्याच्या सहकाऱ्यांना अशा प्रकारे तुरुंगात टाकणे अयोग्य नाही काय असे विचारले असता विमानातून जाणाऱ्या लष्करप्रमुखास तुमचे विमान पाकिस्तानात उतरू शकत नाही, असे सांगत ते भारतात उतरविण्याची सूचना देणे हे तरी योग्य आहे काय, अशी विचारणा मुशर्रफ यांनी केली. बंडानंतर शरीफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अयोग्य वागणूक देण्यात आल्याचा आरोप मुशर्रफ यांनी खोडून काढला.